''मागील लोकसभेला माझ्यासारख्या माथाडीच्या नेत्याला शशिकांत शिंदे यांनी विरोध केला होता. कार्यकर्त्यांची चुकीच्या पद्धतीने अडवणूक करून माझ्याविरोधात प्रचार केला होता.''
सातारा : गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या विरोधात निवडणूक लढलो होतो. या पंचवार्षिक निवडणुकीत कदाचित मी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात व्यासपीठावर दिसणार नाही. मात्र, पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम करणार असल्याची भूमिका माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याचा आरोप झालेल्या शशिकांत शिंदे यांना योग्य वेळेला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. श्री. पाटील म्हणाले, ‘‘मागील लोकसभेला माझ्यासारख्या माथाडीच्या नेत्याला शशिकांत शिंदे यांनी विरोध केला होता. कार्यकर्त्यांची चुकीच्या पद्धतीने अडवणूक करून माझ्याविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे माझा गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावणार असून, उदयनराजे यांना मोठ्या फरकाने निवडून देणार आहे.’’
दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाळासाहेब सोळसकर, शशिकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरी देखील पणन महामंडळ त्यांच्यावर कारवाई करत नाही. शशिकांत शिंदे अनेक ठिकाणी घोटाळा झाला नसल्याचे सांगत आहेत. ते एवढे स्वच्छ आहेत तर पुरावे घेऊन चौकशीला सामोरे जावे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्याने त्यांनी आत्मपरीक्षण करून निवडणुकीतून अर्ज माघार घ्यावा, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.
मागील काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांचा शौचालयाच्या घोटाळ्यात सहभाग नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर मी संबंधित प्रकरणाची कागदपत्रे तपासली असता अनेक सत्य बाबी लक्षात आल्या. यामध्ये शशिकांत शिंदे यांनी अनेक चुकीची कामे केल्यास आढळून आले. त्यामुळे या प्रकरणातील टप्प्याटप्प्याने माहिती लोकांसमोर आणणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.