शरद पवार यांचेही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोंडीवर बारकाईने लक्ष आहे.
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या (Satara Loksabha Constituency) आखाड्यात उमेदवार निश्चिती झाली नसली, तरी महाविकास आघाडी व महायुतीकडून एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्यात चर्चा झाली. मात्र, यात उदयनराजेंचे समाधान न झाल्याने ते अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येते, तर काल पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करत मतदारसंघनिहाय परिस्थितीचा अंदाज घेतला.
उमेदवारांच्या निश्चितीबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आजही सोयीस्कररीत्या मौन बाळगले. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख जवळ येईपर्यंत दोन्हीकडून चर्चेची गुऱ्हाळे अशीच सुरू ठेवली जातील, अशी चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनीही काल रात्री उशिरा महाबळेश्वर येथे मेळाव्यात कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे; परंतु सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
भाजपच्या दुसऱ्या यादीत नाव नसल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी आवाज उठवल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली; परंतु त्यांनीही उमेदवारीबद्दल स्पष्ट न सांगता चेंडू पार्लमेंटरी बोर्डाकडे टोलवला. मंगळवारी रात्री उदयनराजेंना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीचे बोलावणे आले. त्यामुळे वाईतील कार्यक्रम संपल्यानंतर उदयनराजे मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या चर्चेतील सर्व तपशील समोर आला नाही; परंतु राज्यातील कोणत्या मतदारसंघांमध्ये उदयनराजेंचे योगदान आवश्यक आहे, याबाबतची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, चर्चेत समाधान न झाल्याने खासदार उदयनराजे हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. शरद पवार यांचेही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोंडीवर बारकाईने लक्ष आहे. आज त्यांनी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजित पाटणकर, दीपक पवार व राजकुमार पाटील यांची पुणे येथील निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीमध्ये त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कौल जाणून घेतला. उदयनराजे उमेदवार असतील किंवा नितीन पाटील उमेदवार असतील, तर कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती राहील? याची माहिती त्यांनी घेतली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकत्रित मेळावे सुरू करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास रामराजे नाईक निंबाळकर यांनी टोकाचा विरोध केला. मात्र, तरीही भाजपने रणजितसिंह यांना उमेदवारी जाहीर करताच रामराजे यांनी अकलूजला जाऊन मोहिते-पाटलांची भेट घेत विरोधाला धार आणली. परिणामी, फडणवीस यांनी काल रामराजेंशी चर्चा केली. त्यामुळे माढा मतदारसंघात काय भूमिका घ्यायची, यासाठी रामराजे यांनी गुरुवारी (ता. २१) फलटण, माण, खटाव व कोरेगाव (उत्तर) तालुक्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी चारला कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उभे राहण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याबाबत नुकतेच सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांनी आजच्या बैठकीतही शरद पवार साताऱ्यातून उभे राहण्याचा आग्रह केला. तुम्ही उभे राहिला, तर जिल्ह्यातील संपूर्ण जनता पाठीशी उभी राहील. समोर उभे राहण्याचे धाडसही कोणाला होणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी उपस्थितांनी मांडली. त्यावर कोणतेही उत्तर न देता पवार यांनी केवळ स्मितहास्य करत बोलणे टाळले.
माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. आज त्यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. माढ्यासह अन्य मतदारसंघातील रणनीतीबाबत पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे जानकर यांचे म्हणणे आहे, तसेच माजी आमदार लक्ष्मण माने यांनीही आज पवारांची भेट घेतली. त्यांनी लातूर मतदार संघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.