शरद पवारांनी माथाडी कामगाराच्या मुलाला पाच वेळा आमदार व एकदा मंत्री केले. हा संघर्षाचा काळ आहे.
सातारा : देशात कधीही पाहिले नाही, असे सुडाचे राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदींचे धोरण पटले नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना तुरुंगात टाकले जातेय. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामान्यांच्या हिताची जपणूक करणारा, कष्टकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालणारा, स्वार्थी विचार मनात न आणणारा, अखंडपणाने यशवंतराव चव्हाणांच्या आदर्शानुसार सामान्यांसाठी कष्ट करणाऱ्या शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना दिल्लीत पाठवून महाराष्ट्राचा लौकिक देशात वाढविण्याचे काम साताऱ्यातून करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सातारा येथील सभेत केले.
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी आपचे खासदार संजय सिंह, श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, फौजिया खान, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, सचिन अहीर, आमदार बाळासाहेब पाटील, उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘ही ऐतिहासिक सभा आहे. देशात सध्या संघर्षाची स्थिती आहे. त्याला सामोरे जावे लागणार आहे. मोदी काही सांगत असले, तरी देशावर संकट आले आहे. देशाची चार हजार किलोमीटर जमिनी चीनने ताब्यात घेतली आहे. या भागाचा माझा अभ्यास आहे. संरक्षणमंत्री असताना चीनच्या सीमेची मी प्रत्यक्ष पाहणी मी केली होती. धोका कुठून होईल याचे सर्वेक्षण करून काळजी काय घ्यायची याचा अहवाल केला होता; परंतु मोदींनी काळजी घेतली नाही. त्यामुळे हजारो एकर जमीन चीनने बळकावली आहे. त्यामुळे तुमची माझी जमीन जो घालवतो त्याला देशाची सत्ता द्यायची का? याचा निकाल घेण्याची ही निवडणूक आहे.’’
पवार म्हणाले, ‘‘महागाई कमी करू, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून मालाची योग्य किंमत देऊ, असे आश्वासन मोदींनी दिले होते; परंतु तो शब्द त्यांनी पाळला नाही. दहा वर्षांत शेती मालाच्या उत्पादन खर्चाचा विचार अजिबात केला नाही. खते, बी-बियाणे, मजुरी वाढली; परंतु शेती मालाची किंमत वाढवली नाही. मोदींच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जातेय. संजय सिंह, झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यांना, अरविंद केजरीवाल यांना आत टाकले. अशी बरीच उदाहरणे आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल, तर शशिकांतला मोठ्या मतांनी विजयी करणे आपले कर्तव्य आहे.’’
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘अशी सभा पाच वर्षांपूर्वी याच मैदानावर झाली होती. उदयनराजेंच्या विरोधात शरद पवार यांनी पावसात घेतली होती. तुम्ही ९० हजार मतांनी त्या उमेदवाराचा पराभव केला होता. तेव्हा दोन पक्षाची आघाडी होती. आता तीन पक्षांची आघाडी आहे. सहाही विधानसभा मतदारसंघांत स्पर्धा आहे. सर्वाधिक मताधिक्य कोण देणार. आपण पाहिले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासनांची खैरात वाटत आहेत. मंत्री करतो, राज्यसभेचा खासदार करतो म्हणतात; परंतु फार उशीर झाला आहे. मतदारसंघातील जनतेने कधीच निर्णय घेतलाय. ते गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.’’
या वेळी खासदार फौजिया खान, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, आमदार सचिन अहीर, बाळासाहेब पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, डॉ. भारत पाटणकर, ॲड. वर्षा देशपाडे यांनी मनोगत व्यक्त करत शशिकांत शिंदेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘सामान्य मावळ्याला लढायचे बळ तुम्ही दिले आहे. शरद पवारांनी माथाडी कामगाराच्या मुलाला पाच वेळा आमदार व एकदा मंत्री केले. हा संघर्षाचा काळ आहे. नेत्याच्या मागे खंबीर उभा राहून भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यावर टीका सहन करतो; पण शरद पवार यांच्यावर बोललेले सहन होणार नाही. पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना मी उदयनराजेंना समर्थन करत होतो. प्रचाराची धुरा अंगावर घेतली होती. मदत केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे होती. आम्ही नेहमी गादीचा मान ठेवला आहे.
पक्ष बदलाच्या वेळी त्यांना राज्याचे नेतृत्व करा, असे पवारांनी सांगितले होते; पण त्यांनी पक्ष सोडला. त्यामुळे छत्रपतींचा खरा मावळा मला साथ देऊन या वेळी इतिहास घडवेल. दोन चार दिवसांत बऱ्याच घडामोडी होतील. जागृत राहूया, एकीने उभे राहूया. दमबाजी सुरू आहे; परंतु क्रांती उभी करायची असेल, तर दबावाला झुकू नका, मतांसाठी बाहरे पडा. या वेळी पाऊस नाही असे काही म्हणतात; परंतु जनता आता मतांचा पाऊस देईल. राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी करा.’’ रकुलकार्तिकेय पार्वती महादेव व संतोष जाधव यांनी शक्तिप्रदर्शन करत शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दिला.
मागील निवडणुकीचा पावसातल्या सभेचा व्हिडिओ यूपी, बिहार, राजस्थान, हरियानाचे लोक बघतात. याच मैदानावरील सभेनंतर आपण महाराजांचा हरवले होते. यावेळीही हरवणार असे संजय सिंह म्हणाले.
या वेळी पाऊस नाही; परंतु मतांचा पाऊस पाडून कामगार पुत्राला, सर्वसामान्यांचे दुःख जाणणाऱ्या नेत्याला दिल्लीला पाठवायचे. १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीची वीणा हातात दिली आणि माळ गळ्यात घातली. आज एकादशी दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र गटाची ही वीणा तुमच्या गळ्यात देतो, असे म्हणत खासदार श्रीनिवास पाटील यांनी पक्षाचे चिन्ह असलेला मफलर शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात घातला.
बळीराजा संघटनेने शरद पवार यांना आसूड दिला आहे. त्यावर पवार म्हणाले, ‘‘याचा उपयोग इथं बसून करता येणार नाही. दिल्लीला जावे लागेल. देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतात. त्याला धडा देण्यासाठी हा आसूड उपयोगी पडेल.’’
देशाची हजारो एकर जमीन चीनने बळकावली आहे.
शेतीमालाच्या उत्पादन खर्चाचा विचार मोदींनी केला नाही
देशात सूडाचे राजकारण सुरू आहे.
धोरणाला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जातेय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.