Sharad Pawar : शरद पवारांचे भाकीत महायुतीसाठी धोक्याचे

लोकसभेचा अनुभव पाहता पवारांचे हे भाकीत महायुतीसाठी धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट होत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

Mumbai News : सहकारी गेले, घर फुटले, पक्ष गेला, चिन्हही गेले अशाही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात शरद पवार यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांनी अनेक दौरे केले. या दौऱ्यानंतर त्यांनी राज्यात महाविकास आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील, असे भाकीत केले होते.

त्यांचे हे भाकीत खरे ठरले आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये महागाई, बेरोजगारी विरोधात मोठा असंतोष आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. लोकसभेचा अनुभव पाहता पवारांचे हे भाकीत महायुतीसाठी धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट होत आहे.

पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला आलेल्या दहा पैकी सात जिंकत राज्यात विजयाचे प्रमाण सर्वाधिक ठेवले. महाविकास आघाडीला हत्तीचे बळ देण्याचे कामही त्यांनी केले. राज्यातील ४८ पैकी आघाडीला ३१ जागांवर विजय मिळवून देण्यात शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. पवार यांचा वाढलेला आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरणारा आहे.

रणनीती यशस्वी

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वतंत्र होण्याचा घेतलेला निर्णय, त्यानंतर अनेक सहकाऱ्यांनी पक्षाला दिलेले सोडचिठ्ठी यामुळे शरद पवार यांची चांगलीच अडचण झाली. पक्षाची दुरवस्था पाहून शरद पवार सर्व पक्ष अजित पवार यांच्याकडे सोपवतील, अशी अटकळ बांधली जात होती.

मात्र पक्ष फुटीने खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा राज्यात ठिकठिकाणी दौरे करत पक्षाला आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या भाजपविरोधात दंड थोपटले.

पक्षाची बांधणी करत असतानाच त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जागेची मागणी न करता, मिळतील त्या जागा ताकदीने लढण्याचा व तेथून विजय मिळविण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता, निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

संयमी भूमिका

निवडणुकीच्या काळात शरद पवार यांच्या प्रतिमेचे शक्य तेवढे हणन करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. याला त्यांच्या घरातूनच सुरुवात झाली. मात्र कुठेही संयम न सोडता ते या निवडणुकीला सामोरे गेले.

उमेदवारांच्या प्रचाराची यंत्रणा त्यांनी स्वतःच ताब्यात घेत प्रचार यंत्रणा राबवली. वयामुळे, प्रवासामुळे, सभांमुळे आलेला थकवा विसरून त्यांनी प्रचारात जोर लावला. सभा, प्रचारदौरे करतानाच पवार यांनी आघाडीच्या उमेदवारांसाठीही अंतर्गत जोडण्या लावल्या. वर्षांनुवर्षे विरोध करणाऱ्यांना जवळ करत विजयाकडे वाटचाल केली.

भाजपची रणनीती फसली

शरद पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. पवार यांना बारामतीत अडकून ठेवण्यासाठी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात शरद पवार हे व्यग्र राहतील आणि त्यामुळे भाजपला राज्यात इतरत्र घोडदौड करता येईल, अशी त्यामागची रणनीती होती. मात्र एकाच मतदारसंघात थांबून राहतील ते पवार कसले? त्यांनी बारामतीसह पुणे परिसरातील लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठीची यंत्रणा मार्गी लावली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. तसेच विविध संघटना, जुने सहकारी, विरोधक यांना साद घातली. त्यांनीही मोठ्या मनाने पवार यांना प्रतिसाद देत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना एक लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.