Lok Sabha Election : आरोप-प्रत्यारोपात ‘विकासा’ची हरवली चर्चा

राज्याच्या राजकारणातील बदलाचे वारे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावरही परिणाम करणारे ठरले.
shirur lok sabha constituency adhalrao patil dr amol kolhe criticism
shirur lok sabha constituency adhalrao patil dr amol kolhe criticismSakal
Updated on

शिरूर : शिरूर मतदारसंघात अर्जाची छाननी पूर्ण होऊन आता लढतीचे चित्र पूर्ण स्पष्ट झालेले आहे. राज्याच्या राजकारणातील बदलाचे वारे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावरही परिणाम करणारे ठरले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीचे आमदार असलेल्या या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्‍वासू असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचाराला निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सुरुवात केली होती.

निवडणुका आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अजित पवार यांनी थेट अमोल कोल्हे यांना आव्हान देऊन या निवडणुकीत रंगत आणली होती, त्यातून कोल्हे यांच्या प्रचाराला जोर मिळाला. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मात्र एकमेकांवरचा आरोपात आणि श्रेय वादात शिरूरच्या विकासाचे स्थानिक मुद्दे काहीसे मागे पडल्याचे चित्र सध्या आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला शिरूर मतदारसंघ. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. त्यापैकी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले, तर आमदारांपैकी शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवार यांची साथ देणे पसंत केले.

तरीसुद्धा अजित पवार यांनी स्वपक्षातील शिलेदारांऐवजी आढळराव पाटील यांना लोकसभा उमेदवारीची संधी दिली. जनसंपर्कावर हुकूमत असलेल्या आढळराव पाटील यांच्या बाजूने डॉ. कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला जात आहे.

त्याला संसदेतील शेतकऱ्यांसाठी, बैलगाडा शर्यतीसाठी भाषणे आणि कामगिरी याचा दाखला देत कोल्हे यांच्या बाजूने प्रत्युत्तर दिले जात आहे. २५ लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात जातीय समीकरणांचे गणित प्रभावी ठरल्याचे गेल्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

मराठा आरक्षणामुळे काही प्रमाणात जागी झालेली या समाजाची अस्मिता आढळरावांच्या पथ्यावर पडेल असे वाटत असले, तरी मराठेतर ओबीसींसह इतर समाजघटक जुळण्याची धास्तीही त्यांच्यासह महायुतीला आहे.

बैलगाडा शर्यतीसह पुणे- नाशिक महामार्ग, स्थानिक शेतीमाल प्रक्रिया प्रकल्प, औद्योगिकरणाचे जाळे हे मुद्दे दोन्ही बाजूंनी प्रचारात आणले गेले असून, बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादाचा लढादेखील ठिकठिकाणी रंगताना दिसत आहे.

अजित पवार यांचा झंझावात व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांची संपर्क मोहीम सुरू झाली नसताना आणि महायुतीतील इतर आमदार अद्याप अंग झटकून कामाला लागले दिसत नाही. मात्र, बोलक्या प्रचारासह सोशल मीडियावर डॉ. कोल्हे यांचा बोलबाला दिसत आहे.

कोल्हे यांची उमेदवारी निश्‍चित होती. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली. उशिराने उमेदवारी मिळूनही आढळराव यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला असून, सातत्याने लोकांच्या संपर्कात असल्याने निवडणूक आल्यावर मतलबी आव आणण्याची मला गरज वाटत नसल्याची बोचरी टीका ते करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर दिलीप वळसे पाटील विरोधात गेल्याने त्यांच्याच मतदारसंघात देवदत्त निकम यांनी मंचर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा घेत व तुफानी गर्दी जमवत पवारांचा करिष्मा अधोरेखित केला.

तर अजित पवार यांनीही अत्यंत सावध पावले उचलत आढळराव पाटील यांना उमेदवारी देऊन शिवनेरीच्या पायथ्याशी विकासाचे रणशिंग फुंकले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभांचे चोख वेळापत्रक दोन्ही बाजूने केले आहे.

महायुतीतील अनेक दिग्गजांच्या प्रचाराविरोधात डॉ. कोल्हे यांच्यासाठी केवळ शरद पवार यांच्याप्रती निष्ठा हा एकमेव आधार सध्यातरी दिसत आहे. पुणे-नाशिक व पुणे- नगर या महामार्गांवरील वाहतूक कोंडीचा विषय आणि धरणांतील पाण्याचा वाटपाचा मुद्दाही प्रभावी ठरणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ असलेल्या वढू- तुळापूर येथील स्मारकाच्या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्हींकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()