मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघात वाढत असलेली रहदारी व वाढणारी वाहतूक कोंडी, ही समस्या सोडविण्यासाठी नाशिक फाटा- खेड, चाकण- तळेगाव- शिक्रापूर आणि पुणे- शिरूर-नगर महामार्ग एलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे- नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लावणे, कनेक्टिव्हिटी सुलभ व्हावी म्हणून चांगले अंतर्गत रस्ते, बिबट्या-मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना व चाकण रांजणगाव औद्योगिक वसाहतीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. शिरूर मतदारसंघाचा प्रगतीचा नावलौकिक संपूर्ण देशभर व्हावा, हे माझे व्हिजन आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जनता नक्कीच मला साथ देईल,’’ असा विश्वास महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
पुढील पाच वर्षांत मतदारसंघासाठी काय करणार यासंदर्भात ‘सकाळ’शी आढळराव यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शन व आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, चेतन तुपे यांची साथ मला आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार नसतानाही पंधराशे कोटींपेक्षा अधिक निधीची कामे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून आणली. धर्मवीर संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्याला ३९७ कोटींचा निधी, अष्टविनायक मार्ग जोडण्यासाठी २०१५ मध्ये मी संकल्पना मांडली. त्यावर ४०० कोटींचा निधी देवेंद्र फडणवीस यांनी आजवर दिला असून, धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली आहे.’’
जनतेच्या सेवेत रुजू
‘‘माझा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अपघाताने पराभव झाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून जनतेच्या सेवेत रुजू झालो. जनतेला कधीही वाऱ्यावर सोडले नाही. वादळे, जळीत, ओला दुष्काळ जे संकट आले तेथे मदतीसाठी गेलो. कोरोना काळात जीवनावश्यक मदत गरीब कुटुंबांना केली. गावभेट दौरे व जनता दरबारच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. जनतेच्या सुख-दुःखात राहणे, त्यांच्या मूलभूत गरजांसाठी प्रकल्प कार्यान्वित करणे, निधी आणून लोकांची कामे करणे, तसेच जनता दरबार घेऊन प्रश्न सोडवलेत, विकास हेच व्हीजन असून, मतदार हेच माझे शक्तीस्थान आहे. माझे काम मतदारांच्या समोर आहे,’’ असे आढळराव पाटील यांनी सांगितले. खासदार हा मतदारसंघात व जनतेच्या सुख- दुःखप्रसंगी उपलब्ध असावा, ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य आहे. त्याचे मी स्वागतच करतो. संसद, अधिवेशनाच्या कालावधीतही दर रविवारी जनता दरबार पूर्वीही घेतला व यापुढेही जनता दरबार, तसेच सोशल मीडियावर आलेले जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असून, नागरिकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैलगाडा शर्यतींसाठी १७ वर्षे लढा
बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी १७ वर्षे मी लढा दिला आहे. तीन केसेस अंगावर घेतल्या आहेत. विविध न्यायालयांत पाठपुरावा केला. ४८ बैलगाडा घाट मी बांधून दिले आहेत. २००४ च्या सुमारास पहिली बैलगाडा विमा कंपनी सुरू केली. मी हाडाचा शेतकरी आहे. केंद्रात व राज्यात एक विचाराचे महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे विकासकामांना अधिक गती येईल, असा विश्वासही आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
रस्त्यांचे जाळे निर्माण करणार
‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागाप्रमाणे हडपसर, भोसरी हे शहरी भाग आहेत. येथे गृहनिर्माण संस्था व अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. ग्रामीण भागात प्रामुख्याने रस्त्यांचे जाळे, आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातील. गड-किल्ले, आडवाटांवरचा निसर्ग, मंदिरे, पाऊलखुणा, रांजणखळगे येथे पर्यटनाला चालना देऊ, लेणीसंवर्धन, जुन्नरच्या पद्मावती तलावाचे सुशोभीकरण प्रकल्प साकारायचे आहेत. खिरेश्वर ते भीमाशंकर पर्यटन कॉरिडॉर तयार करणे, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे असा राष्ट्रीय मार्ग तयार करण्याची संकल्पना आहे. त्या मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग नाव दिले जाईल. ठिकठिकाणी पर्यटन स्थळांद्वारे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,’’ असे आढळराव पाटील यांनी सांगितले.
लोहमार्गाचा प्रश्न सोडविणार
वाहतूक कोंडी किंवा पुणे-नाशिक लोहमार्गाचा प्रश्न सोडविण्यात गेल्या पाच वर्षांत विरोधकांना यश आले नाही. याउलट माझ्यासह राज्य सरकार व केंद्र सरकारने पुढाकार घेतल्यामुळे रेल्वेच्या कामासाठी निधी मिळाला असून, काही ठिकाणी भूसंपादन झाले आहे. हा प्रकल्प मार्गी लागेल, असा मला विश्वास आहे. या भागात बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजनांचा पाठपुरावा प्रामुख्याने करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.