किस्से निवडणुकीचे : अमेठी येथील काँग्रेसची ‘जादू’

निवडणुकीच्या रणांगणात अनेक पक्ष, उमेदवारांनी भल्याभल्यांना धूळ चारण्याची किमया साधल्याचा इतिहास आहे.
काँग्रेसची ‘जादू’
काँग्रेसची ‘जादू’sakal
Updated on

निवडणुकीच्या रणांगणात अनेक पक्ष, उमेदवारांनी भल्याभल्यांना धूळ चारण्याची किमया साधल्याचा इतिहास आहे. यामागे त्यांची कोणत्या ना कोणत्या प्रकारची मेहनत असते. मात्र, चार दशकांपूर्वी काँग्रेसने प्रचारसभांमध्ये मदन कुंडू या जादूगाराला व्यासपीठावर उभे करून प्रचार केला होता. राजकारण्यांना खूश करणारी हातचलाखी करण्यासाठी कुंडू प्रसिद्ध होते. त्यांच्या अमेठी येथील जादूच्या प्रयोगांचा हा किस्सा आहे.

हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या हातून गेला असला तरी ऐंशीच्या दशकात आणि नंतरही तो काँग्रेसकडेच होता. ८५ च्या निवडणुकीतील मतदानाच्या काही दिवस आधी या मतदारसंघात राजीव गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सोनिया गांधीही उपस्थित होत्या. मात्र, तरीही लोकांची मने जिंकली ती कुंडू यांनीच.

या सभेच्या सुरुवातीला मदन कुंडू यांनी हातचलाखीचे काही प्रयोग सादर केले आणि त्याद्वारे काँग्रेसचा प्रचार केला. त्यांनी प्रथम दोन कोऱ्या पाट्या उपस्थित मतदारांना दाखविल्या आणि प्रश्‍न विचारला ‘लोकांना काय हवे आहे?’. एका पाटीवर ‘प्रगती’ आणि दुसऱ्या पाटीवर ‘स्थैर्य’ असे शब्द उमटलेले सर्वांना दिसले. अर्थातच टाळ्यांचा कडकडाट झाला. कुंडू यांनी या पाट्या परत पुसून कोऱ्या केल्या आणि ‘हे दोन्ही तुम्हाला कोण देऊ शकेल?’ असा प्रश्‍न विचारला आणि एका पाटीवर ‘राजीव’ आणि दुसऱ्या पाटीवर ‘हाता’चे चित्र उमटले.

काँग्रेसची ‘जादू’
Loksabha Election 2024 : भाजपचे ‘घर चलो अभियान’ ; दहा हजार कार्यकर्त्यांचा अडीच लाख मतदारांशी संवाद

त्यावेळी बलशाली काँग्रेसविरूद्ध इतर पक्ष असे चित्र होते. कुंडू हे जादूच्या प्रयोगांमधून या विरोधकांवरही टीका करायचे. ऑलिम्पिकच्या चिन्हासारख्या एकमेकांत अडकविलेल्या पाच कड्या ते मतदारांना दाखवायचे. ‘विरोधक म्हणतात आमची आघाडी मजबूत आहे; पण हे पहा-’ असे म्हणत ते सर्व कड्या सहज वेगळ्या करून खाली टाकायचे. लोक प्रचंड आनंदाने काँग्रेसच्या नावाने घोषणा द्यायचे.

कुंडू यांचे प्रयोग येथेच संपत नव्हते. एका आडव्या बॉक्समध्ये ते महिलेला झोपवून तो बंद करायचे. बॉक्सच्या एका बाजूने महिलेचे शीर, तर दुसऱ्या बाजूने पाय बाहेर आलेले दिसायचे. तीन भागांत बनलेला हा बॉक्स तिरंग्याच्या रंगात रंगविलेला असायचा. ‘ही आपली भारतमाता आहे. बाह्यशक्तीला तिच्यावर असे आक्रमण करायचे आहे- ’ असे म्हणत ते बॉक्सच्या खाचांमध्ये तलवारी खुपसायचे. बॉक्सच्या आत महिला असल्याने प्रेक्षक हा प्रकार श्‍वास रोखून बघायचे. मात्र अखेरीस कुंडू म्हणायचे- तरीही भारतमातेला ते काहीही करू शकणार नाहीत...आणि बॉक्स उघडून आतील महिला बाहेर येत प्रेक्षकांकडे पाहून स्मितहास्य करायची. लोक जादूच्या प्रयोगांना टाळ्या वाजवायचे आणि मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या चिन्हावर शिक्का मारायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.