Kolhapur Loksabha : 'झालं गेलं विसरून लोकसभेला सहकार्य करा'; खासदार मंडलिकांचं केपींना भावनिक आवाहन
'कोल्हापुरातून विद्यमान खासदार म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून एकदा उमेदवारी मिळाल्यावर सर्वजण एक होऊन आपल्या विजयासाठी झटतील.'
बिद्री : कोल्हापूर लोकसभेच्या (Kolhapur LokSabha) उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच खासदार संजय मंडलिक यांनी काल बिद्री साखर कारखान्याचे (Bidri Sugar Factory) अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांची कारखान्याच्या प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. ‘तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीवेळी केलेले आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग होता; परंतु आता झाले गेले विसरून लोकसभेला सहकार्य करा. उमेदवारीचे काहीही होवो, आपला आशीर्वाद राहू द्या,’ असे भावनिक आवाहन खासदार मंडलिक यांनी केले.
यावेळी के. पी. पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्णयानुसार आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे सांगत मंडलिकांना (Sanjay Mandalik) आश्वासित केले. बिद्रीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या विरोधी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व करणारे खासदार मंडलिक हे आज पहिल्यांदाच के. पी. पाटील यांची भेट घेण्यासाठी कारखान्यात आले होते.
मंडलिक महायुतीच्या लोकसभेसाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यानुसार त्यांनी आज के. पी. पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान ‘साखर कारखान्यासंबधी केंद्राचे धोरण हिताचे नाही’, असे के. पी. पाटील म्हणाले. त्यावर यासंबंधी आपण सातत्याने संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे मंडलिक यांनी सांगितले. या भेटीवेळी के. पी. पाटील यांनी मंडलिक यांचा सत्कार केला.
दरम्यान, आजच बिद्रीचे ९ लाख टन गाळप पूर्ण झाले. हा मोठा टप्पा आहे, असे सांगत मंडलिक यांनी के. पी. यांच्या कामाचे कौतुक केले. तर के. पी. यांनीही वेळात वेळ काढून बिद्रीचे इथेनॉलसह अन्य प्रकल्प पाहण्यासाठी यावे, असे मंडलिकांना आवाहन केले. त्यानंतर मंडलिक व पाटील यांची बंद खोलीत सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली.
आमच्या दाजींकडे जरा लक्ष ठेवा...
या भेटीदरम्यान के. पी. पाटील हे मंडलिक यांच्याकडे पाहत म्हणाले, ‘तुमचे मित्र आणि आमच्या दाजींच्याकडे जरा लक्ष द्या. आपल्या माध्यमातून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा.’
‘मंडलिकांना निवडणुकीचे रिंगण नवीन नाही’
बिद्री : ‘आपण विद्यमान खासदार असून महायुतीत शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व १३ खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. आपण शंभर टक्के लोकसभेच्या मैदानात असणार आहे. आपले कार्यकर्ते आतापासून कामाला लागले असून, आता माघार घेणार नाही. आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नसून, निवडणुकीचे रिंगण आपल्याला नवीन नाही,’ असा सूचक इशारा खासदार संजय मंडलिक यांनी दिला.
बिद्री (ता. कागल) येथे खासगी कार्यक्रमानंतर खासदार मंडलिक पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महायुतीत जागेवरून जरूर रस्सीखेच आहे. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्ष विस्ताराचा हक्क आहे. कोल्हापुरातून विद्यमान खासदार म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून एकदा उमेदवारी मिळाल्यावर सर्वजण एक होऊन आपल्या विजयासाठी झटतील. यावेळी माजी जि. प. सदस्य भूषण पाटील, माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, हमिदवाडाचे संचालक आनंदराव फराकटे, वाळवे खुर्दचे माजी उपसरपंच भरत पाटील, आदी उपस्थित होते.
कुपेकरांनी माहिती घेऊन विरोध करावा
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी खासदार मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध केल्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘कुपेकर हे आपले जुन्या काळातील सहकारी आहेत. मागील अडीच वर्षांच्या काळात महायुतीत एकत्र असल्यापासून कुपेकर कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत; परंतु त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून मी त्यांच्या शेताचा रस्ता केला आहे. आपल्याबाबत त्यांचे काही गैरसमज असल्यास समोरासमोर बसून त्यांचे गैरसमज दूर करणार असून, त्यांनी आपल्या कामाची आधी माहिती घेऊन मगच आपल्या उमेदवारीला विरोध करावा.’
समरजित घाटगे यांचे ‘नो कमेंटस्...’
दरम्यान, बिद्री येथील कार्यक्रमावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनीही हजेरी लावली होती. याच ठिकाणी संजय मंडलिक व समरजित घाटगे यांची एकत्रित भेटही झाली. महायुतीतून कोल्हापूर लोकसभा उमेदवारीसाठी घाटगे यांचे नाव भाजपमधून चर्चेत आहे. याबाबत त्यांना विचारले असता घाटगे यांनी पक्ष शिस्तीचे कारण सांगत बोलण्यास नकार दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.