Raigad Loksabha : सुनील तटकरेंच्या नावाची फक्त चर्चा, पण घोषणा नाहीच; महायुतीचा कोण असणार उमेदवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ श्रीवर्धन विधानसभेने तारले होते. अन्य विधानसभा क्षेत्रात त्यांना मताधिक्यही मिळवता आले नव्हते.
गुहागर : रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Loksabha Constituency) महाविकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र महायुतीच्या उमेदवाराची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे (Sunil Tatkare), भाजपकडून धैर्यशील पाटील या नावांची चर्चा असतानाच आता भावी खासदार विकास गोगावले असे फलकही झळकू लागले आहेत. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? याचीच चर्चा रंगू लागली आहे.
भाजपकडून (BJP) खूप आधीपासून रायगड लोकसभेच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. डिसेंबरमध्ये गुहागरातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यात पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर भाजपच्या बैठकांमधून धैर्यशील पाटील यांनी गुहागर, दापोली विधानसभा मतदारसंघात छोट्या संपर्क सभा घेतल्या. गुहागर, दापोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी दोन सभा घेतल्या. परंतू या सभेतून आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचे जाहीरपणे बोलायचे टाळले.
रायगड लोकसभेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे लक्षात आल्यावर माणगावमधील ॲड. राजीव साबळे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपणही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले. मात्र ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत शिवसेनेने हात वर केले. परंतू आता महाड परिसरात युवा सेनेच्या माध्यमातून भावी खासदार विकास गोगावले यांचे फलक झळकु लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ३ आमदार असल्याने या लोकसभा मतदारसंघावर आमचाच हक्क असल्याची भूमिका महाड तालुका युवा सेनाध्यक्ष रोहिदास आंबावले यांनी मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ श्रीवर्धन विधानसभेने तारले होते. अन्य विधानसभा क्षेत्रात त्यांना मताधिक्यही मिळवता आले नव्हते. एकाच घरात १ खासदार, १ राज्यमंत्री व १ आमदार ही चर्चाही तटकरेंसाठी अडचणीची ठरत आहे. रायगड लोकसभेचा पेपर तटकरेंसाठी अवघड असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या परिस्थितीत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष या दोन बलस्थानांच्या आधारावर त्यांना तिकीट द्यायचे की विजयाच्या निश्चितीसाठी खांदेपालट करायचा. या मुद्यांवर महायुतीत एकमत झालेले नाही.
असे आहे पक्षीय बलाबल
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दापोली, महाड व अलिबाग येथील तीन आमदार, भारतीय जनता पक्षाचे पेण येथील आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक श्रीवर्धन आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार गुहागर येथे आहे. पक्षीय बलाबल शिंदे सेनेकडे असले तरी शिवसेनेच्या फुटीनंतर गाव पातळीवर शिंदे सेनेची ताकद किती, अनंत गीते उभे राहिल्यावर शिंदे सेनेला मते किती पडतील याबाबत राजकीय ठोकताळे बांधणे अशक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.