Konkan Lok Sabha : कोकणात 'हायव्होल्टेज' लढतीची चिन्हे; तटकरे विरुद्ध गितेंमध्ये रंगणार सामना, राऊतांविरोधात कोण?
शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते (Anant Geete) यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Elections) ‘हायव्होल्टेज’ लढतीची चिन्हे आहेत. रायगडमध्ये महाविकास आघाडीचे अनंत गिते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यातील लढत निश्चित झाली आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून महाविकासचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याविरोधात महायुती केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
महायुतीचा उमेदवार आज (ता. २९) पर्यंत जाहीर होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेला या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. रायगडमधील लढती या आधीच निश्चित झाल्या आहेत. या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली असे दोन व पुढे रायगडातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग आणि पेण हे विधानसभा मतदारसंघ येतात.
शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते (Anant Geete) यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे. महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. गेल्या लोकसभेवेळी तटकरेंनी गितेंचा सुमारे ३१ हजार मताधिक्क्यांनी पराभव केला होता; मात्र बदललेल्या समीकरणामुळे यावेळची लढत तटकरेंसाठी सोपी राहिलेली नाही. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ठाकरे शिवसेनेला सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मतदारसंघात लोकसभेसाठी शेकापची भूमिका महत्त्वाची ठरते. गेल्यावेळी तटकरेंच्या बाजूने असलेली शेकापची ताकद यावेळी गितेंच्या पाठीशी आहे. गितेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तटकरे यांच्याकडूनही जोरदार मोर्चेबांधणीची तयारी सुरू आहे. त्यांनी स्वपक्ष व मित्रपक्षातील नाराजी दूर करण्याला प्राधान्य दिले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे ठाकरे शिवसेनेचे राऊत यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, येथील चुरस लक्षात घेता भाजप कमळ चिन्हावर दिग्गज उमेदवार देण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. येथून केंद्रीय मंत्री राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. शिंदे गटाच्या किरण सामंत यांचेही नाव चर्चेत आहे.
मात्र, एकूण चुरस लक्षात घेऊन कोकणातील दिग्गज नेते असलेल्या राणेंवर भाजप पक्ष श्रेष्ठींनी जबाबदारी दिल्याचे समजते. शिवसेनेला कोणत्याही स्थितीत शह देऊन भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. अशा स्थितीत स्वतः राणे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. याची घोषणा उद्या (ता. २९) पर्यंत होऊ शकते. राणेंना उमेदवारी मिळाल्यास येथील लढतही हायहोल्टेज असणार आहे. भाजप पूर्ण ताकद लावणार आहे.
राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता
महायुतीतर्फे उमेदवारी कोणाला द्यावी, याचा खल दीर्घकाळ चालला. ठाकरे शिवसेनेला असलेली सहानुभूती आणि त्यांचे उमेदवार राऊत यांचा जनसंपर्क लक्षात घेता दोन्ही जिल्ह्यात ‘रिच’ असलेल्या उमेदवाराची गरज होती. अशा स्थितीत शिंदे गटाकडून किरण सामंत तर भाजपकडून रवींद्र चव्हाण आणि राणे यांची नावे चर्चेत होती. यात राणेंकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.