'शिवाजी पेठ मागे उभी असली की, कोणताही संघर्ष करण्यासाठी दहा हत्तींचं बळ येतं'; संजय मंडलिकांना विश्वास
‘काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नाही म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीत उभे केले आहे.'
कोल्हापूर : ‘माझे बालपण शिवाजी पेठेत (Shivaji Peth) गेले. अनेक जिवलग सवंगडी पेठेने दिले. जे शिवाजी पेठेत होते, तेच जिल्ह्यात घडते. त्यामुळे शिवाजी पेठ पाठीमागे असली की त्याच्या जोरावर दहा हत्तींचे बळ येते,’ असा विश्वास खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी व्यक्त केला. शिवाजी मंदिर येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
शिवाजी पेठेतील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. भाजपचे सरचिटणीस अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, ‘तत्कालीन पालकमंत्र्यांनी थेट पाईपलाईनचे श्रेय घेत अभ्यंगस्नान केले. पण, ते त्यांच्या एकट्याचेच झाले. अजून शहरात थेट पाईपलाईनचे पाणी का पोहोचले नाही?
शहरातील खराब रस्ते, रखडलेली हद्दवाढ हे प्रश्न तत्कालीन पालकमंत्री यांच्यामुळेच प्रलंबित राहिले. काँग्रेसने (Congress) आणलेला टोल भाजपने ४६८ कोटी देऊन घालवला. संजय मंडलिक यांनी शहरासह जिल्ह्यात मोठी विकासकामे केली. प्रत्येक गावात निधी दिला. जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थी वर्ग मोठा आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे.’
खासदार मंडलिक म्हणाले, ‘उमेदवारी जाहीर होण्यासाठी थोडा वेळ झाला. पण, मला विश्वास होता की, उमेदवारी मलाच मिळणार. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मेळावे घेण्यास सुरुवात केली. उमेदवारी जाहीर झाल्यावर शिवाजी पेठेत मेळावा घेण्याचे निश्चित केले. खासदार म्हणून शिवाजी पेठेत एक कोटी रुपयांचा निधी दिला. यातून अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवाजी पेठेत ८० कोटींचा निधी दिला आहे. रंकाळा आणि गांधी मैदान हे कोल्हापूरचे वैभव आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शिवाजी पेठ मागे उभी असली की, कोणताही संघर्ष करण्यासाठी दहा हत्तीचे बळ येते. या बळावर विजय निश्चित असतो.’
यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, शिवाजी जाधव, तुकाराम इंगवले, सुजित चव्हाण, उत्तम कोराणे, अजिंक्य चव्हाण, कुलदीप गायकवाड, सुहास साळोखे, गायत्री राऊत, पवित्रा रांगणेकर, संजय सावंत, महेश सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आभार मानले.
काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नाही
महेश जाधव म्हणाले, ‘काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नाही म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांना निवडणुकीत उभे केले आहे. जसे भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेत खासदार करून त्यांचा सन्मान केला. तसे काँग्रेसने शाहू महाराजांना बिनविरोध राज्यसभेत का पाठवले नाही?’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.