'हातकणंगलेतील गद्दाराला चितपट करून चार जूनला दिल्लीत जाणार'; राजू शेट्टींचा धैर्यशील मानेंवर निशाणा
आमदार जयंत पाटील आणि आमदार सतेज पाटील हे गणपतराव पाटील यांच्या प्रवेशद्वारावर येऊन अंगावर चिलखत घेऊन उभा रहाण्याची तयारी दाखवत आहेत.
कोल्हापूर : ‘साखर कारखानदारांनी (Sugar Factory) सर्वांनी मिळून महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील-सरुडकर यांना निवडणूक रिंगणात उतरले आहे. आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कारस्थानाला आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या मायावी बोलण्याला जनता भुलणार नाही. तसेच, हातकणंगलेमधील (Hatkanangale Lok Sabha) गद्दाराला चितपट करून चार जूनला दिल्लीत जाणार असल्याचा टोला खासदार धैर्यशील माने यांना लगावला.
माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघासाठी बैलगाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दसरा चौक येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. ‘दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी जर सतेज पाटील यांचे ऐकून काम केले, तर त्यांना ऊसदरात शंभर रुपयांची सवलत नाहीच, याशिवाय ऑक्टोबर महिन्यात तुमच्यासमोर कोण छातीचा कोट करतो तेच पाहतो’, असा इशाराही यावेळी दिला.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘आमदार जयंत पाटील आणि आमदार सतेज पाटील हे गणपतराव पाटील यांच्या प्रवेशद्वारावर येऊन अंगावर चिलखत घेऊन उभा रहाण्याची तयारी दाखवत आहेत. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी सतेज पाटील यांनी स्वाभिमानीला एक जागा देतो; पण गणपतराव पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली पाहिजे, अशी अट घातली होती, हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय महामार्ग रोखला होता, त्यावेळी दहा तासांनंतर दगडफेकीचा वरवंटा आपल्यावर फिरवून कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आठ-आठ दिवस तरुण शेतकऱ्यांना पोलिस कोठडी दिली आहे. याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना आदेश देऊन शहरात वाहनांची गर्दी होत आहे, ती रोखण्यासाठी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कोल्हापूर शहरात सोडू नये, असे सांगून रोखले.’
एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक व्ही. एम. सिंग म्हणाले, ‘देशात शेतकरी, खेळाडू, सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत, त्याकडे लक्ष दिले जात नाही. मणीपूरसारख्या राज्यात हिंसाचार सुरू असताना मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही.’
प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ‘हातकणंगले मतदारसंघात एका बाजूला खोकेबहाद्दर आणि दुसरीकडे काळ्या मातीतून आलेला शेतकऱ्यांचा नेता राजू शेट्टी आहेत. शेट्टी यांनी जात-पात पाहिली नाही. मात्र, त्यांना जाती-पातीत अडकवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेली ही संघटना आज सर्व जाती- धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम करत आहे.’
मुख्यमंत्र्यांनी रडीचा डाव बंद करावा
‘महामार्गावर आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रतिटन शंभर रुपये देण्याचे हमीपत्र लिहून देणार होते. त्यामुळे आम्ही रास्ता रोको मागे घेतला. दीड महिन्याची मुदत संपली म्हणून घाई गडबडीने प्रस्ताव मागवले. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांना दिली तर आधीच मागे राहिलेले खासदार धैर्यशील माने अजून मागे राहतील म्हणून तुम्ही या पन्नास आणि शंभर रुपयांचा प्रस्ताव अडवून ठेवला आहे. आता तुम्हाला अडविण्याचे काम शेतकरी आणि कोल्हापूरची जनता करणार असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.
पाच लाखांची देणगी
रॅलीवेळी शेट्टी यांना अरिहंत ग्रुपकडून पाच लाख ९१ हजार ९९५ रुपयांची तसेच आणखी एका कार्यकर्त्यांकडून एक लाख रुपयांच्या देणगीचे चेक देण्यात आले. याचे जाहीर वाचन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.