Kolhapur Lok Sabha : 'कोल्हापुरात आज मी नव्हे, तर रयतेनेच माझा उमेदवारी अर्ज दाखल केला'; शाहू महाराजांना विजयाचा विश्वास
'देशात २१४ च्या वर भाजपला जागा मिळणार नाहीत. म्हणून फोडाफोडीचे राजकरण सुरू आहे. त्यांना जनता कंटाळली आहे.'
कोल्हापूर : लोकसभेच्या (Kolhapur Lok Sabha) कोल्हापूर मतदारसंघात आज मी नव्हे, तर रयतेनेच माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी येथे अर्ज भरल्यानंतर दिली. विजयाची खात्री असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून (Congress) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी अर्ज दाखल केला.
दसरा चौकातून मोठ्या शक्तिप्रदर्शनातून मिरवणुकीने येत दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीचे (Mahayuti) अर्ज दाखल झाल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘मला त्याबद्दल काही माहिती नाही; पण आज मी नाही तर माझा उमेदवारी अर्ज जनतेनेच दाखल केला आहे. शहरी आणि ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात जनता आली आहे.
आपला लोकसभा मतदारसंघ निम्मा ग्रामीण व निम्मा शहरी आहे. त्याप्रमाणे जनता आली. माझा अर्ज भरताना रयतच होती आणि मी रयतेसोबतच आहे. मला माझ्या विजयाची खात्री आहे.’’ यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांना २४ तास कोल्हापुरात राहावे लागले. अर्ज दाखल करण्यासाठी थांबून ताकद पाठीमागे असल्याचे दाखवावे लागले. याचाच अर्थ येथे त्यांच्या उमेदवाराची ताकद नाही, हे स्पष्ट झाले आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज तीन ते चार लाख मताधिक्यांनी विजयी होतील.’’
ते म्हणाले, ‘‘देशात २१४ च्या वर भाजपला जागा मिळणार नाहीत. म्हणून फोडाफोडीचे राजकरण सुरू आहे. त्यांना जनता कंटाळली आहे. किती वर्षे तुम्ही काँग्रेसवर टीका करणार? तुम्ही दहा वर्षांत काय केले, ते सांगत नाही. महागाई किती वाढली हे सांगत नाही. इंडिया आघाडी, महाविकास आघाडी विश्वासास पात्र राहील, हे आता कळून चुकले आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता विरोधाकांचा विषय कट झाल्याचे दिसून येते. कोल्हापूरची जनता खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करणार आहे.’’
राजदंडही
गिरगाव (ता. करवीर) येथील पांडुरंग हिंदुराव साळोखे ‘राजंदड’ घेऊन सहभागी झाले होते. याला ‘धर्मदंड’ ही म्हणत असल्याचे साळोखे यांनी सांगितले. राजाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी हा राजदंड वापरला जातो. पंचधातूचा बनलेला राजदंड आहे. केवळ श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असल्यामुळेच आम्ही वारकरी संप्रदाय हा राजदंड घेऊन येथे आल्याचेही साळोखे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.