'फडणवीसांनी मराठा समाजाला न्याय दिला, पण ठाकरेंना आरक्षण टिकवता आलं नाही'; चंद्रकांत पाटलांचा आरोप
'काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही.’
शिरोळ : ‘महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. त्यांनी मराठा समाजाला कधीही आरक्षण दिले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकवता आले नाही’, असा आरोप मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला.
महायुतीचे हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथे आयोजित भाजप (BJP) मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी वाटप करण्यात आले आहे. असे असताना विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशी दिशाभूल केली. यामुळे मराठा समाजाने या अपप्रचाराला बळी न पडता ‘४०० पार’ नारा खरा करण्यासाठी माने यांनाच मताधिक्य द्यावे.’ घटना बदलण्याचा जो अपप्रचार केला जात आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे पाटील म्हणाले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘लोकसभेची निवडणूक सोपी आहे; पण गांभीर्याने घ्यावे लागेल. काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही.’
खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘कोविडनंतरच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात आठ हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात विकासासाठी निधी दिला आहे. माजी खासदार असणाऱ्या शिरोळ शहरात विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून आम्ही प्रसिद्धीपासून दूर राहिलो. याही निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन इतिहास घडवावा.’ स्वागत भाजप तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी केले. प्रास्ताविक भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केले.
यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, हिंदुराव शेळके, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, विजय भोजे, राहुल घाटगे, अन्वर जमादार, सदाशिव आंबी, डॉ. अरविंद माने, डॉ. नीता माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुष्पा पाटील, नूतन कुमारी, उदय डांगे, सोनाली मगदूम, सुरेश सासणे, भालचंद्र कागले, पोपट पुजारी, जयपाल माणगावे, मिश्रीलाल जाजू, सतीश मलमे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव सांगले, सुनील माने, महेश देवताळे आदी उपस्थित होते. मिलिंद भिडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.