Kolhapur Lok Sabha : आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचविण्यासाठी 'हाता'ला साथ द्या; शाहू महाराजांचं मतदारांना आवाहन
'गादीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी ‘हात’ चिन्हासमोरील बटन दाबून महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवायचा आहे.'
कोल्हापूर : ‘लोकशाहीवर (Democracy) प्रहार करून हुकूमशाही, एकाधिकारशाही येऊ लागली आहे. आता संविधान वाचवायची वेळ आली आहे. त्यासाठी ‘हात’ चिन्हापुढील बटन दाबून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांना मत द्या’, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी येथे केले. जवाहरनगर चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘लोकशाहीवर प्रहार होऊ लागला असून, एकाधिकारशाही, हुकूमशाही वाढत आहे. यातून संविधान (Constitution) धोक्यात येत आहे. एकेकाळी महाराष्ट्रात उद्योग येत होते. आता गुजरातला जात आहेत. हे थांबवायचे असेल तर महाविकास आघाडीला मताधिक्य द्या.’
आमदार सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले की, ‘राजर्षी शाहू महाराजांच्या एकोप्याचे विचार श्रीमंत शाहू महाराज पुढे नेत आहेत. याच गादीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी ‘हात’ चिन्हासमोरील बटन दाबून महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवायचा आहे. कोल्हापूरकरांकडे स्वाभिमान आहे, अभिमान आहे. शाहू महाराज ही अस्मिता आहे. तीच जपण्याचे काम तुम्ही-आम्ही निवडणुकीत करायचे आहे.’
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘बेरोजगारी वाढत आहे. महागाई वाढत आहे. ती रोखण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी तुमची साथ पाहिजे.’ नगरसेवक भूपाल शेटे यांनी विजयानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांची जवाहरनगर चौकात हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचेही जाहीर केले.
माजी नगरसेवक हरिदास सोनवणे आणि नियाज खान यांनी जवाहरनगर, शास्त्रीनगरसह राजेंद्रनगरमधील जनता शाहू महाराजांना साथ देईल, असा विश्वास व्यक्त केला. कक्कया समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव पोळ यांनी स्वागत केले. यावेळी सरलाताई पाटील, प्रा. टी. एस. पाटील, दिलीप पवार, ‘आप’चे संदीप देसाई, निरंजन कदम यांची भाषणे झाली.
कोणी दबाव आणला तर माझ्याशी गाठ
‘लोकशाहीत प्रचार करायला ना नाही; पण आमचा प्रचार करताना कोणी दबाव आणला, नको ती भाषा वापरली तर केव्हाही कॉल करा. या जवाहरनगर चौकात मी स्वतः हजर आहे. कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर याद राखा. माझ्याशी गाठ आहे. विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरली आहे. त्यामुळे येथे असे होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनीही खडा पहारा द्यावा. माता-भगिनींनो, विरोधकांची प्रचार फेरी आली तर केवळ घरातील गॅस सिलिंडर बाहेर दारात आणून ठेवा. पूर्वी दर किती होता, आता किती आहे, असे विचारा,’ असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.