हमीदवाडा कारखाना कर्नाटकातील बड्या नेत्याला विकला? मुश्रीफ म्हणाले, राजकारणासाठी किती बदनामी..
'मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, यावर्षीच्या हंगामात सर्वप्रथम एफआरपी देणारा ‘हमीदवाडा’ हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे.'
कागल : ‘हमीदवाडा साखर कारखाना (Hamidwada Sugar Factory) कर्नाटकातल्या व्यक्तीला विकल्याचा आरोप १०० टक्के खोटा आहे. राजकारणासाठी किती बदनामी आणि अपप्रचार करणार?,’ असा संतप्त सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला. ‘१०० टक्के खोट्या बातम्या पेरून मुद्दामहून शाहू महाराजांच्या विरोधात विधाने करावीत, असा तर हेतू नाही ना? त्यामुळे शाहू महाराजांची (Shahu Maharaj) प्रतिमा डागाळली जाईल, अशी कोणतीही कृती करू नका,’ असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल येथील खर्डेकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ‘हमीदवाडा कारखाना विकला आहे, अशी शंभर टक्के खोटी बातमी छापून आली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी अध्यक्ष आहे. बँकेचे त्या कारखान्यावर कर्ज आहे. कारखाना बँकेला तारण आहे. त्यामुळे तसे असते तर त्या विषयाची माहिती मला झालीच असती.
मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, यावर्षीच्या हंगामात सर्वप्रथम एफआरपी देणारा ‘हमीदवाडा’ हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे. याच्यावर कळस म्हणजे दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी दूध संघ विकला, हमिदवाडा साखर कारखानाही विकावा लागेल, अशा आशयाची विधाने आली आहेत. कालच्या प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ‘हमिदवाडा’ विकलेला नाही, हे त्यांनीच मान्य केलेले आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘महालक्ष्मी दूध संघ बंद झाल्यानंतर लोकसभेच्या तीन निवडणुका झाल्या. त्यामुळे विरोधक महालक्ष्मी दूध संघ बंद असल्याचे सांगून शिळ्या कढीलाच ऊत आणत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ आणि वारणा दूध संघ सक्षम असल्यामुळे त्यांच्यासमोर इतर दूध संघांचा टिकाव लागला नाही. ते बंद झाले. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येताच संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारतीय संविधान बदलू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही समाज घटकांनी विचलित होऊ नये.’
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘केडीसीसी’चे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, नामदेवराव पाटील, नवल बोते, ॲड. संग्राम गुरव, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, बाबासो नाईक, सतीश घाटगे, सागर गुरव, संजय फराकटे, शशिकांत नाईक, संग्राम लाड, अजित निंबाळकर, इरफान मुजावर, आदी उपस्थित होते. स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी केले. तर आभार चंद्रकांत गवळी यांनी मानले.
भारती पोवार यांना एक कोटीच्या अब्रूनुकसानीच्या दाव्याची नोटीस
म्हाकवे : हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना कर्नाटकातील एका नेत्याला विकल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या भारती पोवार यांच्यावर एक कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आल्याची नोटीस कारखान्याने पोवार यांना बजावली आहे. पोवार यांनी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसह जाहीर माफी मागावी, अन्यथा तुमच्याविरुद्ध फौजदारी खटला अथवा नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.