नवी दिल्ली : ‘‘निवडणूक रोख्यांबाबतचे बिंग फुटल्यामुळे जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे,’’ असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.
एक प्रकारे ही हुकूमशाही आहे, असा दावा ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक लोक असे आहेत की ज्यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. मात्र नंतर या लोकांना पक्षात घेत त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आले.
दुसरीकडे जे लोक भाजपच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. देशात हुकूमशाही येईल अशी भीती नाही, तर हुकूमशाही आली आहे. या हुकूमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर येऊन करणार आहोत.
‘‘निवडणूक रोख्यांचा भाजप हा सर्वात मोठा लाभार्थी आहे. रोख्यांच्या माध्यमातून पैसा देणाऱ्या अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावर आधी तपास संस्थांनी छापे घातले होते. भाजपला पैसे देणाऱ्या कंपन्यांना मोठी कंत्राटे मिळाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा गवगवा होऊ लागल्यामुळे जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली’’ असा आरोप ठाकरे यांनी केला.
‘‘महाराष्ट्रात गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. त्यानंतर गद्दारी करून सरकार स्थापन करण्यात आले. चित्र-विचित्र लोकांना सोबत घेण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. फसवणूक करणाऱ्या लोकांना भाजप पक्षात घेत अभय देण्याचे काम करत आहे,’’ अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली.
तृणमूल काँग्रेसतर्फे खासदार डेरेक ओब्रायन आणि सागरिका घोष हे सहभागी.
महारॅलीत सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले, तर प्रियांका गांधी यांनी समारोपाचे भाषण केले.
डेरेक ओब्रायन आणि ‘माकप’चे सीताराम येचुरी यांच्या खुर्च्या एकमेकांच्या बाजूला ठेवल्या होत्या. मात्र त्यांनी एकमेकांपासून दूर बसणे पसंत केले.
व्यासपीठासमोर लावलेले अरविंद केजरीवालांचे पोस्टर काँग्रेसच्या आक्षेपानंतर हटविण्यात आले.
अरविंद केजरीवाल यांचा संदेश त्यांच्या पत्नी सुनीता यांनी वाचून दाखवला. ‘देशात २४ तास वीजपुरवठा, गरिबांना मोफत वीज, प्रत्येक गावात सरकारी शाळा, गाव-गल्ल्यांमध्ये मोहल्ला रुग्णालये, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार एमएसपी, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा आणि प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालय,’ अशी आश्वासने या संदेशात दिली आहेत.
दिल्लीच्या गादीवर बसलेले सत्ताधारी जास्त दिवस सत्तेत राहणार नाहीत. भाजप चारशे जागा हरणार आहेत. बदला घेण्याच्या मानसिकतेतूनच हेमंत सोरेन, केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. केवळ देशच नाही, जगभरातील लोक आज भाजपचा तिरस्कार करत आहेत.
- अखिलेश यादव, ‘सप’चे अध्यक्ष
जयप्रकाश नारायण यांनी ४७ वर्षांपूर्वी ‘स्वातंत्र्य हवे की गुलामी’ असा सवाल लोकांना केला होता. त्यावर्षी झालेल्या निवडणुकीत स्वातंत्र्याचा विजय झाला होता. आम्ही आज तोच नारा देत आहोत. स्वातंत्र्य, संविधान, लोकशाही आणि देशाला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
- सीताराम येचुरी, माकप नेते
पंतप्रधान मोदी वादळाप्रमाणे आले होते, आता वादळासारखेच निघून जातील. भाजपचे लोक देशात नागपूरचा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- तेजस्वी यादव, ‘राजद’चे नेते
कोणताही वकील नाही, युक्तिवाद नाही, विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले जात आहे. मागील दोन वर्षांपासून उमर खालिद तुरुंगात आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत नाही तर संविधान वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत.
- मेहबूबा मुफ्ती, ‘पीडीपी’ नेत्या
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.