Sangli Loksabha: सांगलीत शिवसेना जिंकली, हरली पण वाढली नाही; 'मातोश्री'वरूनही मिळालं नाही बळ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्यात स्नेहबंध होते.
Uddhav Thackeray Sangli Sabha
Uddhav Thackeray Sangli Sabhaesakal
Updated on
Summary

मिरज विधानसभा मतदार संघात २००४ पर्यंत शिवसेनेची बांधणी मजबूत होती. सेनेच्या नावाचा दबदबा होता.

सांगली : शिवसेनेच्या (Shiv Sena) स्थापनेपासून सांगली जिल्ह्यात (Sangli) ठाकरेंनी विविध प्रयोग केले. विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत उमेदवार उतरवले. काही प्रयत्न यशस्वी झाले, तर बहुतांश ठिकाणी सेनेला अपयश आले. शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले गेले नाहीत. म्हणावे तसे बळ ‘मातोश्री’वरून मिळाले नाही, तरीही इथला शिवसैनिक नेटाने उभा राहिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्यात स्नेहबंध होते. सांगली हा दादांचा जिल्हा. त्यामुळे दादा हयात होते, तोवर बाळासाहेबांनी येथे शिवसेनेचे फारसे प्रयोग केले होते. दादांच्या निधनानंतर सन १९९० ला विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तब्बल सहा उमेदवार उतरवले, मात्र वसंतदादांच्या घराण्याविरुद्ध सांगलीत उमेदवार दिला नाही.

जतला आनंदराव आडसूळ, कवठेमहांकाळला बाळासाहेब माने, तासगावला बाळासाहेब कुलकर्णी, मिरजेत आप्पासाहेब काटकर, शिराळ्यात शोभाताई नाईक, भिलवडी-वांगीत सुरेश यादव यांना उमेदवारी दिली. सर्वत्र पराभव झाला, मात्र काही ठिकाणी चांगली लढत दिली गेली. इतक्या वर्षांनंतर आज शिवसेनेकडे मजबूत नेटवर्क नाही, हे वास्तव आहे. उसनवारीवर आलेले नेते सेनेला सोडून निघून गेले. शिवसैनिक उरले, त्यांच्यावर आता पुन्हा उसनवारीसाठी ताकद लावण्याची वेळ आली आहे.

Uddhav Thackeray Sangli Sabha
..अखेर 'सांगली'बाबत उद्धव ठाकरेंनी ताठर भूमिका सोडली; काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार, लवकरच निघणार तोडगा?

मिरज विधानसभा, हातातोंडाशी घास

मिरज विधानसभा मतदार संघात २००४ पर्यंत शिवसेनेची बांधणी मजबूत होती. सेनेच्या नावाचा दबदबा होता. बजरंग पाटील यांनी अत्यंत प्रभावी लढत दिली होती. विजयाचा घास हातातोंडाशी आला होता. सन २००९ ला मतदार संघ आरक्षित झाला आणि जागावाटपच्या फेररचनेत शिवसेनेने ‘मिरज’ भाजपला देण्याची महाचूक केली, असे शिवसैनिक सांगतात. मिरजेतून सलग तीनवेळा सुरेश खाडे आमदार झाले. खाडे यांनी शिवसेनेकडून लढावे, असा त्या वेळी प्रस्ताव होता. ठाकरेंची ती चूक सेनेला महागात पडली.

पै. पृथ्वीराज लढले, पण टिकले नाहीत

पृथ्वीराज पवार यांना २०१४ ला भाजपने उमेदवारी नाकारली. भाजपचा झेंडा घेऊन अर्ज भरायला गेलेल्या पवारांना ऐनवेळी शिवसेनेचा झेंडा हाती घ्यावा लागला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांच्या प्रचाराला आले. तिरंगी लढतीत पृथ्वीराज यांना ३७ हजार मते मिळाली. पृथ्वीराज यांना युवा सेनेत संधी देत आदित्य ठाकरेंच्या जवळच्या केडरमध्ये घेण्यात आले, मात्र ते फार काळ शिवसेनेत टिकले नाहीत.

Uddhav Thackeray Sangli Sabha
Indira Gandhi : काँग्रेस पक्षात फूट पडली अन् इंदिरा गांधींनी घेतला महिलांच्या काळजाचा ठाव

अनिल बाबर पहिले आमदार

आघाडीच्या राजकारणात खानापूर-आटपाडी मतदार संघ काँग्रेसकडे होता, अनिल बाबर राष्ट्रवादीत. त्यांना ही जागा कधी सुटेल, अशी आशा वाटेना. बंडखोरीचे राजकारण किती दिवस करणार? २०१४ ला भाजप-सेनेचे वारे वाहू लागले होते. मतदार संघ युतीत शिवसेनेकडे होता. बाबर यांनी भगवा हाती घेतला. मात्र, विधानसभेला युती तुटली.

बाबर यांनी शिवसेनेतून लढत दिली, ताकद लावली आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार झाले. त्यांनी सलग दोनवेळा ठाकरेंच्या नेतृत्वात विजय मिळवला. अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांच्यासह जिल्हा परिषदेला तीन सदस्य विजयी झाले. सुहास जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले. बाबर शिवसेनेत येणे, आमदार होणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांत पद मिळवणे, खानापूर पंचायत समितीत सत्तेत येणे, ही शिवसेनेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी कमाई होती. पुढे, बाबर बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेले. ठाकरेंच्या हाती तिथे आता फार काही शिल्लक नाही.

महापालिका स्वबळावर

शिवसेनेने सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा धाडसी प्रयत्न केला. त्या वेळी पृथ्वीराज पवार सेनेत होते, मात्र त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने ४० जागांवर उमेदवार दिले. खासदार गजानन कीर्तिकरांसह प्रा. नितीन बानुगडे-पाटील तळ ठोकून होते. तेव्हाचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला आले होते. ठाकरे कुटुंबातून कुणीही प्रचाराला आले नाही. शिवसेनेला या निवडणुकीत आपले खाते उघडता आले नाही.

Uddhav Thackeray Sangli Sabha
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : 'शेतकऱ्यांसह वानर माकडांचा प्रश्न सोडवेल तोच होणार खासदार'

जिल्हाप्रमुखांचे डिपॉझिटच जप्त

सन २०१९ ला पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघात भाजपची आव्हानात्मक ताकद असताना शिवसेना हट्टून या जागेवर लढली. जिल्हाप्रमुख संजय विभूते यांना उमेदवार दिली. काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांनी एकतर्फी आणि प्रचंड विजय मिळवला. त्यावेळी संजय विभूते यांना ८ हजार ९७६ मते मिळाली होती. भाजपच्या विरोधामुळे ‘नोटा’ला तब्बल २० हजार ६३१ मते मिळाली होती. राज्यात ‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे हे एकमेव उदाहरण होते. शिवसेना जिल्हाप्रमुखांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली.

गौरव, रघुनाथदादा यांच्या हाती धनुष्यबाण

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शेतकरी नेते रघुनाथदादा २००९ ला लढले. त्यांनी ३ टक्के म्हणजे ५५ हजार मते मिळाली. पुढे, इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या विरोधात गौरव नायकवडी मैदानात उतरले. त्यांनी ३५ हजार मते घेतली. १ लाख १३ हजार मते घेत जयंत पाटील विजयी झाले. इस्लामपूर नगरपालिकेत शिवसेना लढली, तेथे शिवसेनेने खाते उघडले. ‘हातकणंगले’तून धैर्यशील माने २०१९ ला खासदार झाले, मात्र ते ठाकरेंकडे राहिले नाहीत.

Uddhav Thackeray Sangli Sabha
Kolhapur Lok Sabha : 'कौन है यह मुन्ना, कहाँसे आया..' शरद पवारांच्या एका वाक्यावरच फिरली 2004 ची निवडणूक

घोरपडे लढले, पडले... टिकले

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून शिवसेनेला माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यासारखा तडगा उमेदवार मिळाला. घोरपडे यांची भाजपमधूनच लढायची इच्छा होती, मात्र सेनेने जागा सोडली नाही. घोरपडे लढले. त्यांना ३२ टक्के म्हणजे ६५ हजार ८३९ मते मिळाली. आमदार सुमन पाटील १ लाख २८ हजार ३७१ मते घेत विजयी झाल्या. घोरपडे पराभूत झाले, मात्र आजही ते शिवसेनेत टिकले आहेत. महाविकास आघाडीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना जिल्हा बँकेचे संचालक केले. अर्थात, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला विश्‍वासात न घेता आमदार जयंत पाटील यांनी घोरपडे यांच्या पारड्यात आपली ताकद टाकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.