पूर्वांचलचा बालेकिल्ला राखणे भाजपसाठी ठरणार मोठे आव्हान

पूर्वांचलमधील बस्ती, आंबेडकर नगर आणि संत कबीर नगर हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. तिन्ही ठिकाणी सहाव्या टप्प्यात म्हणजे २५ मे रोजी मतदान होत आहे.
uttar pradesh purvanchal place winning challenge to bjp lok sabha election
uttar pradesh purvanchal place winning challenge to bjp lok sabha electionSakal
Updated on

बस्ती : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात लोकसभेचे वीस मतदारसंघ असून मागील दोन निवडणुकांत भाजपने या ठिकाणी भरघोस यश मिळवले होते. मात्र यावेळी काही अपवाद वगळले तर बहुतांश मतदारसंघात भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत असल्याचे येथे फिरत असताना जाणवले.

मागील दोन निवडणुकात भाजपला मोदी लाटेचा मोठा फायदा झाला होता. यावेळी कोणतीही लाट दिसत नसल्याने राज्यातील पैकीच्या पैकी जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार काय? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्वांचलमधील बस्ती, आंबेडकर नगर आणि संत कबीर नगर हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. तिन्ही ठिकाणी सहाव्या टप्प्यात म्हणजे २५ मे रोजी मतदान होत आहे. मतदान आठवडाभरावर आले असले तरी लोकसभा निवडणूक असल्याचे चित्र फारसे कोठे दिसत नाही. अधून-मधून एखाद्या उमेदवाराची प्रचार करणारी गाडी येते आणि निघून जाते. विविध पक्षांच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांची उठबस मात्र वाढली आहे.

बस्ती मतदारसंघात भाजपचे उमेदवार हरीश द्विवेदी यांना यावेळी हॅट्‌ट्रिकची संधी आहे. दयाशंकर मिश्रा यांना यावेळी बहुजन समाज पक्षाने (बसप) उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते.

मात्र महिनाभरात बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मिश्रा यांचे तिकीट कापत लवकुश पटेल यांना मैदानात आणले जात असल्याची घोषणा केली. दोन ब्राह्मण उमेदवारांच्या लढाईत समजवादी पक्षाचे (सप) उमेदवार रामप्रसाद चौधरी यांचा फायदा झाला असता.

पण मिश्रा यांचे तिकीट कापण्यात आल्याने द्विवेदी निश्चितपणे हॅट्रिक मारतील, अशी आशा आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. अर्थात सपचे उमेदवार चौधरी यांना कमी लेखून चालणार नाही, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे.

आंबेडकर नगर मतदारसंघात गतवेळी बसपच्या रितेश पांडे यांनी विजय मिळवला होता. निवडणूक तोंडावर असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना लगोलग तिकीटही जाहीर केले. पांडे यांची लढत सपच्या लालजी वर्मा यांच्याशी होत आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत वर्मा हे बसपमध्ये होते.

मायावती यांनी हकालपट्टी केल्यानंतर वर्मा सपमध्ये आले. थोडक्यात मूळ बसपच्या दोन नेत्यांमध्ये यावेळी लढत होत आहे. रितेश पांडे हे बसपचे संसदीय पक्षनेते होते. त्यामुळे त्यांनी जेव्हा बसपाला रामराम केला, तेव्हा राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. रितेश यांचे वडील राकेश पांडे हे सपचे जलालपूरचे आमदार होते. मात्र त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने आंबेडकर नगरमध्ये भाजपची बाजू मजबूत बनली आहे.

निषाद यांना पुन्हा संधी

संत कबीर नगर मतदारसंघात विद्यमान खासदार प्रवीण निषाद यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. मतदारसंघात ते फारसे दिसत नसल्याची स्थानिक लोकांची तक्रार आहे. मागील दोन निवडणुकांत निषाद यांची तत्कालीन बसप नेते कुशल तिवारी यांच्याशी लढत झाली होती. तिवारी यावेळी ‘सप’तर्फे जवळच्या डुमरियागंज मधून निवडणूक लढवीत आहेत.

अशावेळी सपने निषाद कार्ड खेळत लक्ष्मीकांत उर्फ पप्पू निषाद यांना येथून मैदानात उतरवले आहे. निषाद, मुस्लिम आणि यादव समाजाची मते निर्णायक असलेल्या या मतदारसंघात ‘बसप’ने नदीम अशरफ यांना संधी दिली आहे. जातीपातीच्या समीकरणात अडकलेल्या या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांना भरपूर कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.