पश्चिम विदर्भात ‘वंचित’च्या प्रभावामुळे तिरंगी लढती; पहिल्या टप्प्यातील मतदानानंतरच होणार बड्या नेत्यांच्या प्रचारसभा

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, अमरावती, बुलडाणा या पाच मतदारसंघांमध्ये २६ एप्रिलला मतदान होणार आहे.
vanchit political party lok sabha election after first polling big leader in battle of election
vanchit political party lok sabha election after first polling big leader in battle of electionsAKAL
Updated on

नागपूर : दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, अमरावती, बुलडाणा या पाच मतदारसंघांमध्ये २६ एप्रिलला मतदान होणार आहे. वर्धा वगळता उर्वरित चारही मतदारसंघांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आहे. त्यामुळे अकोला, यवतमाळ-वाशीम, अमरावती, बुलडाणा येथे तिरंगी लढती होत आहेत. तिरंगी लढतीचा फटका मोठ्या पक्षांना अर्थात काँग्रेस आणि भाजपला बसल्याचा इतिहास आहे.

वर्धा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे रामदास तडस आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरदचंद्र पवार) अमर काळे यांच्यात थेट लढत होत आहे. तडस तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, बसप यासह काही राज्यस्तरीय पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्या सोबतीला अपक्षांचा भरणा आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत.

वाशीम लोकसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. भावना गवळी येथून सातत्याने विजयी झाल्या आहेत. पण, त्या शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल, अशी आशा होती.

पण, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना तिकीट दिल्याने गवळी यांना मोठा धक्का बसला. भाजपच्या आग्रहाखातर भावना गवळींचा पत्ता कट केला असला तरी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात खुद्द भाजपमधील खदखद बाहेर आली.

महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे लोकसभा समन्वयक राजू पाटील राजेंची खुर्चीच भाजप आमदार पुत्राने बळकावली. व्यासपीठावरील गोंधळ जनतेपर्यंत गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्यासोबत घटक पक्ष दिसत नसल्याने महाविकास आघाडीत बिघाडी तर झाली नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे तेवढी चुरस निर्माण झाली आहे. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे प्रमुख उमेदवार आहेत.

महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे तसेच प्रहारचे दिनेश बूब रिंगणात असल्याने यंदाची ही निवडणूक काट्याची राहील, हे स्पष्ट असल्याचे मानले जात आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना(उद्धव ठाकरे), शिवसेना(एकनाथ शिंदे) वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना या पक्षांचा समावेश आहे. तसेच ‘बुलडाणा मिशन’चा उमेदवारही रिंगणात आहेत.

अकोला मतदारसंघात सलग २० वर्षांपासून अकोला लोकसभेत भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात सामना रंगला आहे. रिंगणात १५ उमेदवार असले तरी लढत या तिघांत होणार आहे.

प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. त्या तुलनेत धोत्रे आणि अभय पाटील पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. बदलल्या राजकीय परिस्थितीत कुणबी समाज भाजपवर नाराज असून ॲड. आंबेडकरांकडे कुणबी समाजाचा कल वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी कुणबी समाजाचे नेतृत्व करतात. अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील हे मराठा पाटील उमेदवार आहेत. यांच्यात मतांचे विभाजन होणार असल्याने आंबेडकरांना फायदा होण्याची शक्यता आहे.

वर्धा मतदारसंघातील सभा

  • भाजप ः योगी आदित्यनाथ

  • राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)ः जयंत पाटील, सुषमा अंधारे

  • नियोजित सभाः पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे

वाशीम मतदारसंघातील सभा

  • भाजप ः पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • शिवसेना(उद्धव ठाकरे)ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • शिवसेनाः एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, संजय राठोड

अमरावती मतदारसंघातील सभा

  • शिवसेना(उद्धव ठाकरे)ः सुषमा अंधारे

  • नियोजित सभाः नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे,

  • योगी आदित्यनाथ, अमित शहा, देवेंद्र फडणवीस.

बुलडाणा मतदारसंघातील सभा

  • नियोजित सभाः उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    अकोला मतदारसंघातील सभा

  • भाजपः देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील

  • काँग्रेसः नाना पटोले

  • नियोजित सभाः पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.