Yashwantrao Chavan : भारत-चीन युद्ध अन् हिमालयाच्या मदतीला धावला 'सह्याद्री'
दिल्लीवरून पंतप्रधान पंडित नेहरूंचा फोन आला. चिटणीसांनी घाईघाईने तो निरोप यशवंतरावांना दिला.
- सतीश पाटणकर
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांची आठवण काढल्यानंतर ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला,’ या वाक्प्रचाराचा नेहमी उल्लेख केला जातो. चीनच्या युद्धानंतर (India China War) संरक्षणमंत्रिपदाचा कार्यभार यशवंतराव चव्हाण यांनी सांभाळला होता. त्यांनी भारताचा संरक्षण विभाग मजबूत करण्यासाठी काही आमूलाग्र बदल केले होते. १९६२ मध्ये चीनने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. २० ऑक्टोबर १९६२ पासून चीनने आक्रमण सुरू केले.
त्यानंतर हे युद्ध एक महिना चालले आणि २१ नोव्हेंबर १९६२ ला चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केल्यानंतर ते थंडावले. या काळात १ नोव्हेंबरला तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला होता. १ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षण मंत्रालयाचे (Ministry of Defence) कामकाज पाहिले. पं. नेहरू यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना हे पद सांभाळण्यासाठी दिल्लीला बोलावले. यशवंतराव चव्हाण यांनी हे पद पुढची चार वर्षे सांभाळले. तेव्हापासून हा वाक्प्रचार रुढ झाला.
यशवंतराव चव्हाण यांच्या कालावधीतच भारत आणि पाकिस्तान यांचे १९६५ चे युद्ध झाले. पं. नेहरू यांनी दाखविलेला विश्वास यशवंतरावांनी सार्थ ठरविला आणि पं. नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या पंतप्रधानपदांच्या काळामध्ये त्यांना संरक्षण मंत्रालयाचा पदभार सांभाळता आला. त्यानंतर यशवंतरावांच्या कर्तृत्वाची कमान चढतीच राहिली. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अर्थ, गृह, परराष्ट्र, संरक्षण अशा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चारही मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. यशवंतरावांची संरक्षणमंत्रिपदासाठी निवड करत असल्याचे सांगून त्यांचे मत विचारण्यासाठी पं. नेहरूंनी त्यांना फोन केला.
यशवंतराव मुंबईत सचिवालयात दैनंदिन कामकाज पाहत असताना त्यांना दिल्लीवरून पंतप्रधान पंडित नेहरूंचा फोन आला. चिटणीसांनी घाईघाईने तो निरोप यशवंतरावांना दिला. यशवंतरावांनी फोन उचलताच त्यांच्या कानावर शब्द पडले, ‘‘मी जवाहरलाल बोलतो आहे. जवळपास कोणी बसलेले नाही ना?’’ ‘‘कोणी नाही’’, असा यशवंतरावांकडून निर्वाळा मिळताच जवाहरलाल बोलले, ‘‘संरक्षण खात्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवू इच्छितो. तुम्ही दिल्लीला आले पाहिजे, असे मला वाटते. येणार ना तुम्ही? आणि त्याची फारशी चर्चा न करता हो किंवा नाही, एवढंच उत्तर मला हवं आहे.’’ थोडा वेळ विचार करून यशवंतराव म्हणाले, ‘‘मला एका व्यक्तीला विचारावं लागेल.’’
काहीशा रागानेच नेहरू म्हणाले, ‘‘अशी कोणती व्यक्ती आहे की, जिला विचारल्याशिवाय काम अडणार आहे?’’ यावर यशवंतराव बोलले, ‘‘मुंबई सोडून दिल्लीला जाण्याची परवानगी मला किमान माझ्या पत्नीकडून अगोदर घ्यावयास हवी.’’ यशवंतरावांच्या या उत्तरावर मनमुराद हसून नेहरू बोलले, ‘‘हो जरूर, सौ. चव्हाणांशी तुम्ही जरूर बोला आणि दोन दिवसांत तुमचा निर्णय मला कळवा.’’ दोन दिवसांनंतर यशवंतरावांनी आपण दिल्लीला येण्यास तयार असल्याचे नेहरूंना कळविले. संरक्षण विभागाचा कायापालट करण्याचे काम हातात घेतल्यावर यशवंतरावांनी काही नवे निर्णय घेतले.
दररोज सकाळी ते तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रमुखांची बैठक घेत. यामध्ये ते स्वतः या सर्वांकडून माहिती घेत त्यांचे ऐकून घेत. या बैठका एकतर्फी संवादाच्या नसत. अमेरिका आणि इंग्लंडच्या मदतीवर विसंबून न राहता त्यांनी सोव्हिएत युनियन म्हणजे सध्याच्या रशियाकडे जाणे पसंत केले. केवळ मिग विमानेच नाही, तर रणगाडे, हेलिकॉप्टर, जमिनीवरून हवेत मारा करणारी शस्त्रास्त्रे रशियाबरोबर उत्पादित करण्याचे त्यांनी निश्चित केले. चीन युद्धानंतर रशियाने भारताला १०० कोटी रुपयांपर्यंतचे सहकार्य केले.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.