औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी शहरात महसूल मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संभाजीनगरला आमचा विरोध असेल अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यावर भाजपकडून टीका होऊ लागली आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील शनिवारच्या (ता.दोन) ‘संभाजीनगर!’ या संपादकीयातून समाचार घेण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, की औरंगाबाद शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास ‘गलीच्छ’ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही, असे स्पष्ट करित संपादकीयामध्ये पुढे म्हटले, की विरोध जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे.
सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करुन टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत.थोरातांच्या विधानानंतर भाजपने शिवसेनेला भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना संपादकीयेत शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरूस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको.
भाजपला सवाल
अलाहबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ.ए.पी.जे.अद्बुल कलाम केले. त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करुन तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका, असा प्रश्न संपादकीयेत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला आहे. महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजी राजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? व आता शिवसेनेत उलटा प्रश्न विचारीत आहात.
नावाच्या राजकारणावर स्पष्टीकरण
औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून राजकारण होत असल्याची टीका होत आहे. याला प्रत्युत्तर देताना संपादकीयेत म्हटले आहे, की औरंगजेब आणि औरंगाबाद हा आता मतांचा विषय राहिलेला नाही. महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादाचा मार्ग स्वीकारुन शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यांना आता फालतू वाद नकोत तर विकास आणि कल्याण हवे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.