सोलापूर : पुण्यातील अपघातानंतर सोलापूर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत शहर पोलिसांनी १०६ तर ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे ८० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागला आहे. ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’च्या कारवाईसाठी शहर-ग्रामीणमधील वाहतूक पोलिसांकडे ९७ ब्रेथ ॲनालायझर मशिन देण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात २०२३ मध्ये ७२३ जणांचा तर २०२४ मध्ये जवळपास दीडशे जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात रोखण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांवर कारवाई सुरू केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नांदणी, मंगळवेढा (इचगाव), सांगोला (आढळगाव), वळसंग, सावळेश्वर, वरवडे, पेनूर या टोल नाक्यांवर कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे ग्रामीण पोलिसांची दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत रात्रगस्त देखील सुरू आहे. शहर वाहतूक पोलिसांनीही शहरात येणाऱ्या रस्त्यांसह शहराअंतर्गत विविध ठिकाणी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. सायंकाळी पाच ते रात्री ११ तर कधी रात्री दहा ते साडेबारा वाजेपर्यंत ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जात असल्याचे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, धनाजी शिंगाडे यांनी सांगितले.
मद्यपी वाहनचालकांवर विशेष लक्ष
रस्ते अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून विशेषत: मद्यपी वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. सोलापूर ग्रामीणच्या हद्दीतील सात टोल नाक्यांजवळ मद्यपींची तपासणी केली जात आहे. ग्रामीण पोलिसांकडून ६० ब्रेथ ॲनालायझर मशिन आहेत.
- कमलाकर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, सोलापूर ग्रामीण
पोलिस ठाण्यांकडूनही आता अचानक कारवाई
सोलापूर ग्रामीणमध्ये २५ तर सोलापूर शहरात ७ पोलिस ठाणे आहेत. ज्या तालुक्यात टोल नाके नाहीत, अशा ठिकाणी पोलिस ठाण्यांकडून अचानकपणे नाकाबंदी करून ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाणार आहे. सोलापूर शहरातही आता नियमितपणे अशा कारवाया होतील. मद्यपान करून वाहन चालविताना चालक आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यानंतर त्याला किमान १० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.
‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’साठी कारवाई काय?
दारू पिऊन वाहन चालविताना पकडल्यास त्या चालकावर गुन्हा दाखल होतो
मद्यपी चालकाचा खटला न्यायालयात पाठविला जातो, त्याठिकाणी किमान १० हजारांचा दंड होवू शकतो
मद्यपी चालकाला किमान सहा महिन्यांपर्यंत शिक्षेतची तरतूद आहे
मद्यपी चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित होतो
‘ब्रेथ ॲनालायझर’ मशिन काय करते
ब्रेथ ॲनालायझर हे श्वासोच्छवासाचा नमुना वापरून शरीरातील रक्तातील अल्कोहोल सामग्रीचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. मद्यपी चालकाला त्या मशिनमध्ये श्वास सोडायला सांगितले जाते. त्या व्यक्तीच्या शरीरात ३० मिलीग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल असेल तर त्या मशिनमधून त्या चालकाच्या फोटोसह प्रिंट येते. त्यावर त्याची स्वाक्षरी घेतली जाते. तो कागद संबंधित मद्यपी चालकांवरील पुढील कारवाईसाठी न्यायालयात पाठविला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.