करंट लागून सोलापूर जिल्ह्यातील 108 जणांचा मृत्यू! शेतकऱ्यांना दिवसा वीजेची प्रतीक्षा तर सोलापूरकरांना पाणी भरण्यासाठी लावाव्या लागतात ईलेक्ट्रिक मोटारी

शेतकऱ्यांना अद्याप दिवसा वीज मिळाली नसल्याने त्यांना आजही रात्रीच्या अंधारातच शेतात जावे लागत आहे. दुसरीकडे, सोलापूरकरांना चार-पाच दिवसांआड तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पावणेदोन लाखांपैकी सव्वालाख कुटुंबातील लोक इलेक्ट्रिक मोटारी लावूनच पाणी भरतात.
sakal solapur
sakal exclusivesakal
Updated on

सोलापूर : शेतकऱ्यांना अद्याप दिवसा वीज मिळाली नसल्याने त्यांना आजही रात्रीच्या अंधारातच शेतात जावे लागत आहे. दुसरीकडे, सोलापूरकरांना चार-पाच दिवसांआड तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पावणेदोन लाखांपैकी सव्वालाख कुटुंबातील लोक इलेक्ट्रिक मोटारी लावूनच पाणी भरतात. या दोन्ही जोखमीच्या कामी २५ महिन्यांत ६० पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. १ एप्रिल २०२२ ते मे २०२४ या काळात जिल्ह्यातील १०८ जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने पाण्याची फार टंचाई शेतकऱ्यांना जाणवत नाही, पण पावसात वीज चालू-बंद करताना अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देतानाही अनेकांचा मृत्यू झाला आहे. पाच-सहा दिवसांचे पाणी एकदम भरून ठेवण्याच्या घाईगडबडीत काही सोलापूरकरांना देखील जीव गमवावा लागल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे. मागील २५ महिन्यांतील १०८ मृतांमध्ये सर्वाधिक मृत्यू पंढरपूर (२९), सोलापूर ग्रामीण (३१) व सोलापूर शहर (२३) हे विभाग अव्वल असल्याचे ‘महावितरण’कडील आकडेवारीतून स्पष्ट होते.

शेतकऱ्यांना दिवसा विजेबाबतची सद्य:स्थिती

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी एकूण १० हजार एकर जमीन लागणार आहे. त्यावर दोन हजार मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात चार हजार एकरावर दोन हजार मेगावॉटचा सौर प्रकल्प टाकण्याचे नियोजन आहे. पण, त्यासाठी चार हजार एकर जमीन लागणार असून, त्यापैकी सध्या दोन हजार ७० एकर सरकारी जमीन ‘महावितरण’ला मिळाली आहे. उर्वरित जमीन खासगी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांना ३० वर्षांसाठी जमीन भाड्याने द्यावी लागणार असून, त्यासाठी हेक्टरी सव्वा लाख रुपयांचे (एकरी ५० हजार रुपये) दरवर्षी भाडे त्यांना दिले जाणार आहे. पुरुषोत्तम प्रोफाइल या कंपनीच्या माध्यमातून पहिल्यांदा सरकारी जागेवर ८१ मेगावॉटचा सौर प्रकल्प टाकला जाणार असून, उर्वरित सहा मक्तेदार कंपन्यांच्या माध्यमातून इतर ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार आहेत. तूर्तास सध्या कार्यवाही ठप्प आहे.

सोलापूरकरांना पुरेशा दाबाने पाणी नाहीच

सोलापूर शहरात उंच- उंच इमारती उभारल्या जात आहेत, पण अनेक ठिकाणी ना पुरेसे पार्किंग ना पाणी साठवून ठेवण्याची सोय दिसते. दुसरीकडे, शहराचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली पण जलवाहिनी कमी इंचीचीच आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने आणि नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांना इलेक्ट्रिक मोटार लावूनच पाणी भरावे लागत आहे. मोटारी लावून पाणी भरताना अनेकांचा विजेचा धक्का लागून जीव गमवावा लागला आहे. नोव्हेंबरमध्ये समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.

२५ महिन्यांतील मृत्यू

  • विभाग मृत्यू

  • अकलूज ११

  • बार्शी १४

  • पंढरपूर २९

  • सोलापूर ग्रामीण ३१

  • सोलापूर शहर २३

  • एकूण १०८

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी...

  • एलसीबी किंवा एनसीपी हे यंत्र वीज मीटरजवळ बसवावे, जेणेकरून धक्का लागला तरी माणसाचा मृत्यू होत नाही.

  • वायरिंग आयएसआय मानांकनाची असावी, पाण्याच्या ठिकाणी किंवा रहदारीच्या ठिकाणी जोड नकोच.

  • बटण चालू-बंद करताना हँडग्लोव्ह्‌जचा वापर करावा, पाण्यात वायर राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.

  • पावसात किंवा पाण्यात वीज चालू-बंद करण्याचा प्रयत्न करू नये; स्वीचमध्ये पाणी नसल्याची खात्री करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.