सोलापूर : जिल्ह्यातील बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणीसाठी केंद्राच्या माध्यमातून तब्बल एक हजार ४३७ एकर (५७५ हेक्टर) जमिनीचे संपादन झाले. त्यासाठी अंदाजे १२३ कोटींचा खर्चही करण्यात आला. पण, सद्य:स्थितीत विमानतळ सुरु करण्यासंदर्भात काहीही हालचाली सुरू नाहीत. या विमानतळासाठी जनरेटा अजूनही सुरूच आहे. तरीपण, निर्वनीकरण होणार नाहीत, तर विमानतळासाठी संपादित जमिनीचे पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
होटगी रोडवरील विमानतळ छोटे असल्याने जिल्ह्यात होटगी रोडवरील विमानतळाऐवजी सोलापूर जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे, या हेतूने माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणीची निवड करून त्यासाठी ५७५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. तेथे विमानतळ होऊ शकते म्हणूनच १२३ कोटींपर्यंत खर्च करण्यात आला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देखील भूसंपादनासाठी जवळपास २० कोटींचा निधी दिला होता. २०१० पासून भूसंपादनाची कार्यवाही २०२२ पर्यंत सुरु होती.
जनतेचा पैसा त्याठिकाणी खर्च झाला असून आता त्या जमिनीचे पुढे काय, असा प्रश्न आहे. एका सरकारच्या काळात तेथे विमानतळ होऊ शकते म्हणून एवढी मोठी रक्कम खर्च केली जाते, तर सत्तांतरानंतर त्याठिकाणी विमानतळ होऊ शकत नसल्याचे सांगितले जाते, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने होटगी रोडवरील विमानसेवा सुरु होणार हे निश्चित झाले आहे.
तरीपण, बोरामणी विमानतळासाठी देखील प्रयत्न करायला काय हरकत, असा मतप्रवाह समोर येत आहे. खर्च झालेल्या जनतेच्या पैशाचा योग्य वापर त्यातून होईल, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यासाठी ३३ हेक्टर निर्वणीकरणाचा फेर प्रस्ताव सादर करून सतत पाठपुरावा करून त्या प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिल्यास विमानतळ शक्य असल्याचेही काही वरिष्ठ अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर सांगत आहेत. ताडोबा अभयारण्यातून महामार्ग गेले आहेतच की, असेही त्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
शिंदेंना क्रेडिट जाऊ नये म्हणून कार्यवाही ठप्प
केंद्र सरकारने पूर्ण अभ्यास करूनच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी बोरामणीची निवड केली आणि येथील जमिनी संपादित केल्या. केवळ एका माळढोक पक्षामुळे, तोही त्याठिकाणी आहे की नाही, हे कोणीही स्पष्टपणे सांगायला तयार नाही. तरीसुद्धा त्याठिकाणी काहीतरी कारण देऊन विमानतळाला खोडा घालण्याचे काम सध्याच्या सरकारकडून होत असल्याचे जाणवते. केवळ शिंदेंना त्याचे क्रेडिट जाऊ नये या हेतूने तेथील निर्वनीकरण हटवले जात नाही, असे दिसते.
पण, बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास निश्चितपणे सोलापूरचा सर्वांगिण विकास शक्य आहे, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. त्यासाठीच माझा तो प्रयत्न होता, पण आता राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
निर्वनीकरणाचा कोणताही फेर प्रस्ताव आला नाही
बोरामणी विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनीत ३३ हेक्टर वन विभागाची जमीन आहे. त्याच्या निर्वनीकरणासाठी दुसरीकडे तेवढ्या जमिनीचा शोध घेतला. त्यानुसार २०१३ मध्ये रिजनल इमपॉवर्ड कमिटी, नागपूरकडे निर्वनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. २०२० मध्ये तो प्रस्ताव फेटाळला, पण पुढे कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.
- धैर्यशील पाटील, उपवनंरक्षक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.