सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदापासून पदवीचे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ संकुलात आता बीएससी व बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसीएस, बीसीए आणि बीलिब अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. याशिवाय अन्य काही अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले असून त्यातून निश्चितपणे विद्यार्थ्यांना भविष्यात शासकीय किंवा खासगी नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ संकुलात बारावीनंतर विद्यार्थ्यांना आता थेट पदवी शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, अद्यावत सोयी- सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, प्रयोगशाळा, वसतिगृहाची देखील सुविधा विद्यापीठात आहे. दुसरीकडे पारंपरिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण घेता यावे आणि त्यातून नोकरीची संधी सहजपणे उपलब्ध होईल, यादृष्टीने विद्यापीठाने आता उद्योगांची गरज व नोकरीच्या संधी याचा विचार करून नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
‘बीएसस्सी पदवी’साठी विषय
बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘बीएसस्सी’साठी थेट प्रवेश मिळणार आहे. मॅथेमॅटिक्स, स्टॅटेटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, जिओलॉजी, एनव्हॉयर्मेंट सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मासिटिकल टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झुलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडता येणार आहेत.
-----------------------------------------------------------
‘कॉमर्स’च्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पदवी अभ्यासक्रम
बारावी कॉमर्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यापीठात यंदा प्रथमच बी-कॉम प्रोफेशनल अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी आहे. यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याबरोबरच विद्यापीठ कॅम्पसमध्ये यंदा प्रथमच कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीबीए, बीसीए, बीसीएस आणि बीलिब पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. पण, बीबीए, बीसीए व बीलिब या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.
---------------------------------------------------------
पदवी अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश
विद्यापीठात नव्याने सुरू झालेल्या बीएसस्सी, बीकॉम प्रोफेशनल या अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in संकेतस्थळावरून देखील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांची माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ. धवल कुलकर्णी (मो. ९४२३५९१३६०), डॉ. मुकुंद माळी (८८३०३२६६१५) व डॉ. सदानंद शृंगारे (९०९६५८८९१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
---------------------------------------------------------
‘या’ अभ्यासक्रमांच्या पदवीनंतर नोकरीची मोठी संधी
विद्यापीठात बीएसस्सी पेन्ट टेक्नॉलॉजी, बीएसस्सी इन फार्मासिटिकल अँड फाईन केमिकल्स टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियिल मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मॅथेमॅटिक्स, एनव्हारमेंटल सायन्स या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिले जात आहेत. या नवीन अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना किमान १० ते १५ लाख रूपयांच्या पॅकेजवर नोकरीची संधी उपलब्ध होईल, पीएच.डी केल्यानंतर पुन्हा नोकरीच्या संधी वाढतील, असे विद्यापीठातील तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, बीएसस्सी इन फूड टेक्नॉलॉजी, बीएसस्सी पॉलिमर टेक्नॉलॉजी, बीएसस्सी इन कॉन्स्ट्रक्शन केमिकल्स, बीएसस्सी एन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम पुढच्या वर्षी विद्यापीठात सुरू होणार आहेत.
----------------------------------------------------------------------
आर्टिफिशल इंटेलिजन्सबरोबरच अनेक अभ्यासक्रम
बीएसस्सी इन डाटा सायन्स अँड बिझनेस अनालिसिस (३+१ वर्ष), एमएसस्सी इन डाटा सायन्स अँड बिग डाटा अनालिसिस (दोन वर्षे), बीएसस्सी इन डाटा इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशल इंटेलिजन्स (चार वर्षे), पीजी डिप्लोमा इन डाटा सायन्स अँड बिझनेस एनालिसिस (एक वर्ष), बीएसस्सी इन सायबर सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी (तीन वर्ष), एमएसस्सी इन सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट अँड पॉलिसी (दोन वर्षे), बी- टेक एन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक (चार वर्षे), एम-टेक इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक (दोन वर्षे), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी (एक वर्ष), एमबीए इन बिझनेस अनालिटिक्स दोन वर्षे, असे कोर्सही करता येणार आहेत.
‘बीएससी अॅग्री ऑनर्स’मध्ये आता तीन विषय
पारंपरिक बीएससी ॲग्री या कोर्समध्ये सुद्धा बदल झालेला आहे. याचे नाव बीएससी अॅग्री ऑनर्स असे करण्यात आले आहे. यामध्ये चार प्रकार झालेले आहेत. बीएससी ॲग्री बायोटेक (बी टेक बायोटेक) बीएससी ॲग्री बिजनेस मॅनेजमेंट व बीएससी ॲग्री हॉर्टिकल्चर असे प्रकार पडलेले आहेत. सर्वांची प्रवेश प्रक्रिया सीईटी द्वारे करण्यात येते. पूर्वी बारावीचे गुण ३० टक्के व सीईटीचे गुण ७० टक्के गृहित धरून प्रवेश प्रक्रिया की पूर्ण केली जात होती. आता शंभर टक्के सीईटी गुणावर प्रवेश दिला जातो. सीईटी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीवर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च (एमसीएइआर) यांचे नियंत्रण आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. चार प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच ॲग्री पॉलिटेक्निकल हा तीन वर्षाचा डिप्लोमाही उपलब्ध आहे. सर्व अभ्यासक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संलग्न आहेत. कृषी पदवी कार्यक्रमांसह बीएससी ॲग्री बायोटेक (बी टेक बायोटेक) बीएससी ॲग्री बिजनेस मॅनेजमेंट बीएससी ॲग्री हॉर्टिकल्चर बी टेक कृषी अभियांत्रिकी असे पदवी अभ्यासक्रम आहेत. सर्वांची प्रवेश प्रक्रिया सीईटी द्वारे करण्यात येते. पूर्वी बारावीचे गुण ३० टक्के व सीईटीचे गुण ७० टक्के गृहित धरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जात होती. आता शंभर टक्के सीईटी गुणावर प्रवेश दिला जातो. सीईटी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीवर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च (एमसीएइआर) यांचे नियंत्रण आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. वरील चार प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच ॲग्री पॉलिटेक्निकल हा तीन वर्षांचा डिप्लोमा ही उपलब्ध आहे. सर्व अभ्यासक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संलग्न आहेत.
कृषी तंत्रच्या ६०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
सोलापूर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका व कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमाच्या ५४० जागांसाठी बुधवारपासून (ता. २६) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय व विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालय व कृषी तंत्र निकेतनसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, यासाठी १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. कृषी तंत्र पदविका हे मराठी माध्यमातील अभ्यासक्रम दोन वर्षांचे तर कृषी तंत्र निकेतन हे पूर्ण इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम तीन वर्षांचे आहे. जिल्ह्यात एक शासकीय तर सात विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालय आहेत. त्यात प्रत्येकी ६० जागा आहेत. तर जिल्ह्यात दोन विनाअनुदानित व परजिल्ह्यात एक शासकीय असे एकूण तीन कृषी तंत्रनिकेतन आहेत. त्यात प्रत्येकी ४० जागा आहेत. अशा एकूण ६०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी विद्यापीठाच्या httpः//mpkv.diplomaadmission.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये प्रवेश अर्ज शुल्क आहे. विद्यार्थ्याने दोन वर्षे मराठी माध्यम व तीन वर्षे इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमासाठी वेगवेगळा अर्ज भरायचा आहे. एका अभ्यासक्रमास एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास शेवटी दाखल अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे.
----------------------------------------------------------------------------
प्रवेश अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
दहावी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्वाचा दाखला. शेतकरी असल्यास १२ टक्के तर क्रीडा, स्काऊट गाईड, एमसीसी, एनसीसी, सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागासाठी दोन टक्के गुण आहेत. त्यामुळे सातबारा अथवा शेतकरी असल्याचा दाखला, क्रीडा, स्काऊट गाईड, एमसीसी, एनसीसी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
---------------------------------------------------------------------------
जिल्ह्यातील कृषी तंत्र विद्यालये
शासकीय कृषी तंत्र विद्यालय, सोलापूर, विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालय अकलूज (ता. माळशिरस), गौडगाव (ता. बार्शी), अनगर (ता. मोहोळ), बार्शी (ता. बार्शी), बोराळे (ता. मंगळवेढा), कडलास (ता. सांगोला).
----------------------------------------------------------------------
जिल्ह्यातील कृषी तंत्र निकेतन
विनाअनुदानित कृषी तंत्र निकेतन, एखतपूर (ता. सांगोला), वडाळा (ता. उत्तर सोलापूर). तर कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शासकीय तंत्र निकेतन मालेगाव (जि. नाशिक) येथे आहे.
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमातील उपलब्ध संधी व वैशिष्ट्ये
ग्रामसेवक, कृषिसेवक, कृषी सहाय्यक पदासाठी संधी
साखर कारखाने, सूतगिरणीत शेती विभागामध्ये नोकरीची संधी
स्वतःचे कृषी सेवा केंद्र, डेअरी, नर्सरी, ग्रीन हाऊस, प्रक्रिया उद्योग उभारता येईल.
शासकीय कृषी योजनेत विविध पदांवर सर्वेक्षक म्हणून संधी
कृषिपूरक उद्योग उभारल्यास अनुदानास पात्र
सिंचन विभागात पाटकरी, कालवा निरीक्षक व इतर समकक्ष पदांवर संधी
बी बियाणे, खते, कीटकनाशके उत्पादन व इरिगेशन कंपन्यांत नोकरीची संधी
डेअरी, पोल्ट्री, नर्सरी, ग्रीन हाऊस, प्रक्रिया उद्योगात पर्यवेक्षक पदावर संधी
माती परीक्षण, शेतमाल प्रक्रिया, गांडुळ खत उत्पादन, रोपवाटिका व्यवस्थापन, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन उद्योग उभारता येईल.
कृषी तंत्र व निकेतन विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीची संधी
शेतीसाठी उपयुक्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते.
ॲग्रीक्लिनिक अँड ॲग्रीबिझनेस या अभ्यासक्रमासाठी पात्र. व्यवसाय भांडवलासाठी बँकेकडून कर्जपुरवठा केला जातो.
कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्रीला थेट द्वितीय वर्षात प्रवेशास पात्र
_____________________________________________________
विद्यार्थ्यांनी मुदतीत करावेत अर्ज
कृषी तंत्र व निकेतन अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शासकीय, कृषी, कृषीपूरक उद्योगात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करावेत.
- जयंत जाधव, प्राचार्य, शासकीय कृषी तंत्र विद्यालय, सोलापूर
मेडिकल क्षेत्रातूनही नोकरीची संधी
सोलापूर : मेडिकल क्षेत्राशी निगडित असलेले आणि अन्नातील घटकापासून ते औषधातील घटकांपर्यंत शिक्षण देणारे बी फार्मसी व एम फार्मसी क्षेत्र आहे. यामध्ये युवकांना विविध प्रकारच्या करिअरच्या संधी असण्याबरोबर स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठीदेखील हे शिक्षण उपयुक्त आहे. या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक बदल झाले नाही. तर महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांना सर्वांगिण सक्षम बनविण्यासाठी विविध संशोधनात्मक उपक्रम, कार्यशाळा घेऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होतात.
----------------------------------------------------------------
संशोधनावर सर्वाधिक भर : यामध्ये ॲनिमल आणि ह्यूमन स्टडी आणि डेटा यावर मोठे काम केले जाते. जेणे करून कोवीडसारख्या काळात फार्मसी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर नवनवीन आजार, त्यावर संशोधन करून होणारी औषध निर्मिती हा अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जेणे करून या क्षेत्रातील युवकांना करिअरसाठी अनेक मार्ग उपलब्ध होतात.
--------------------------------------------------------------
जिल्ह्यातील फार्मसी महाविद्यालयांची संख्या : १४
एकूण विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता : १०८०
शहरातील सर्वात जुने फार्मसी महाविद्यालय : शिवदारे महाविद्यालयाची क्षमता १००
करिअरच्या संधी : कंपनी, उत्पादन, मार्केटिंग, सेल्स, शासकीयमध्ये आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, हॉस्पिटल फार्मासिस्ट, अन्न औषध विभाग अशा विविध प्रकारची संधी यामध्ये मिळते.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे चार विद्यापीठांमधून शिक्षण
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशिवाय जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बाटु), भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि एमआयटी या विद्यापीठाचे देखील कामकाज सुरू आहे. या पाच विद्यापीठांपैकी तीन विद्यापीठांचे कामकाज स्वतंत्रपणे त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे. ‘बाटू’कडे जिल्ह्यातील अभियांत्रिकीची आठ तर फार्मसीची ११ महाविद्यालये संलग्नित आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी जिल्ह्यातील १०८ उच्च महाविद्यालये संलग्नित असून २००९ मध्ये ही संख्या ११९ पर्यंत होती. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात २२ जुलै २०२४ मध्ये स्वतंत्र सोलापूर विद्यापीठ मंजूर झाले आणि १ ऑगस्ट २००४ पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. २००९ पासून विद्यापीठात शैक्षणिक संकुल प्रणाली सुरू झाली आणि सध्या विविध अभ्यासक्रमांच्या संकुलाअंतर्गत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुढे विद्यापीठाचे नामांतर झाले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नाव मिळाले. विद्यापीठाअंतर्गत सध्या ७० हजारांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिवाजी नगर व केगावजवळ एमआयटी विद्यापीठ सुरू झाले आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना बी टेक (सीएसई), बी. टेक (सीएस ॲण्ड एआय), बी. टेक (आयटी), बी. टेक (ईसीई), बी. डेस, बीबीए, बीसीए, एमबीए, एमसी अशा अभ्यासक्रमातून शिक्षण घेता येणार आहे. बी.फार्मसी प्रस्तावित आहे. कुलगुरू गोपाळकृष्ण जोशी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. याशिवाय भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व बाटु या विद्यापीठ देखील जिल्ह्यात कार्यरत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशिवाय अन्य विद्यापीठांमधूनही जिल्ह्यातील अंदाजे १० हजारांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत आहेत.
विद्यापीठाच्या अधिक माहितीसाठी...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अधिक माहिती su.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विद्यापीठाचे दूरध्वनी क्रमांक 0217-2744771 किंवा 0217-2474772 असे आहेत.
----------------------------------------------------
‘अभियांत्रिकी’च्या ४९६० तर ‘फार्मसी’च्या १०८० जागा
जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सहा तर तीन फार्मसी महाविद्यालयांसह ‘बाटु’कडील आठ अभियांत्रिकी महाविद्यालये व ११ फार्मसी महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता सहा हजारांपर्यंत आहे. त्यात ‘फार्मसी’च्या एक हजार ८० तर ‘अभियांत्रिकी’च्या पाच हजारांपर्यंत जागा आहेत. पण, ‘जेईई’ उत्तीर्ण १५ टक्के आणि ‘सीईटी’ उत्तीर्ण ६५ टक्के विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. उर्वरित २० टक्के जागा संबंधित महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यातील असतात.
वैद्यकीय क्षेत्रातल्या भविष्यासाठी सोलापुरात भरघोस सुविधा
सोलापूर : आपल्या पाल्याला जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुढचे करीअर करावयाचे असेल तर सोलापूरमध्ये अनेक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत, त्यात प्रवेश घेत पाल्याचे भविष्य उत्तमरित्या घडविता येते, असे विचार या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ‘सकाळ’ शी चर्चा करताना मांडले. डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये ऑर्थोपेडिक, गायनिक, सर्जरी यासह अनेक अभ्यासक्रम आहेत. याचा विद्यार्थ्यांनी विचार करून संधीचा उपयोग केल्याने भविष्यात त्यांना फायदा होईल असे मत विद्यालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी सांगितले. याठिकाणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून उत्तम दर्जाचे शिक्षण या शिक्षण संकुलात दिले जाते. काही दिवसात नव्या अभ्यासक्रमासंदर्भात बैठक होत असून उपलब्ध असणाऱ्या कोर्सेसमध्ये काही नवे अपडेट कोर्स करता येतील का, यावर विचार करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेदमध्येही विविध संधी उपलब्ध असून आगामी काळामध्ये डायट म्हणजे समतोल आहार आणि योगा यावरील सर्टिफिकेट कोर्सही सुरू होत असल्याची माहिती आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या विणा जावळे यांनी सांगितले. तर अनेक वर्षांपासून बी. ए. एम. एस हा पदवी तर त्याच्या पुढील पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करण्याची सुविधाही येथे असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाचा वैयक्तिक फायदा तर होईलच होईल तसेच येथील प्रत्येक अभ्यासक्रमातून घडलेल्या विद्यार्थी त्याचा व्यावसायिक रित्या ही स्वतःला उपयोग करून घेता येईल, असा आमचा विचार असतो. समतोल आहार आणि योगा हे भविष्यातील प्रोजेक्ट असून काही महिन्यांमध्ये त्याला सुरवात होईल असाही विश्वास त्यांनी दर्शविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.