सोलापूर : सोलापुरातील उद्योग विश्वाला भरारी देणारी बँक म्हणून एकेकाळी सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेची ओळख होती. नंतर ही बँक २०११ पासून अवसायनात गेली. या बँकेतून १९९३ मध्ये सोने तारण कर्ज काढलेल्या कर्जदारांच्या वारसांनी थकबाकीचे २ हजार २७८ रुपये जमा केल्याने वारसांना अंदाजे १५ तोळे सोने परत मिळाले आहे. या दागिन्यांना सध्या लाखमोलाचा भाव असला तरीही मृत बहिणीची आठवण ३१ वर्षांनी परत मिळाली म्हणून ८० वर्षीय वारस बहिण खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
सोलापूर नागरी औद्योगिक बँकेतून १९९३ मध्ये सौ. शाबेरा दादावली देशमुख (शेख) यांनी सोने तारण कर्ज घेतले होते. शिक्षिका व शिकवणीचे काम करणाऱ्या शेख यांनी त्यांच्याकडील सोने बँकेत गहाण ठेवले होते. ही बँक २०११ मध्ये अवसायनात आली, नंतरच्या काळात कर्जदार सौ. शाबेरा दादावली देशमुख (शेख) यांचाही मृत्यू झाला. आपल्या बहिणीची आठवण आपल्याकडे असावी म्हणून तिचे दागिने मिळविण्यासाठी खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार या वयोवृद्ध महिलांनी बँकेकडे पाठपुरावा केला. न्यायालयानेही सौ. शाबेरा दादावली देशमुख (शेख) यांच्या वारस म्हणून खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार यांना निश्चित केले होते. या प्रकरणात बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी अधिकाऱ्यातील माणुसकीचे दर्शन दाखवत या वारसांना तारणातील सोने परत देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आल्या होत्या. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात त्यांना आरोग्याच्या कारणास्तव येता येत नव्हते. जिल्हा उपनिबंधक गायकवाड हे सर्व कागदपत्र व दागिने घेऊन स्वत: त्यांच्या वाहनाजवळ आले. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून त्या वारसांकडे गायकवाड यांनी दागिने सुपूर्द केले. यावेळी सहायक निबंधक गावडे आबासाहेब, उमेश पवार, कार्यालय अधीक्षक के. के. कंकाळ, ए. आर. वर्देकर, आर. एन. ढोणे, बँकेचे वसुली अधिकारी एन. टी. कैरमकोंडा, बँक अधिकारी एस. आर. इराबत्ती आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.