सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसगाड्यांमधून दरमहा ६५ ते ७० लाख प्रवासी ये-जा करायचे. पण, मागील दोन वर्षांत प्रवाशांची संख्या तब्बल १५ ते २० लाखाने घटली आहे. त्यामुळे लालपरीला दरमहा जवळपास १५० कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे नवीन बस खरेदी व प्रवाशांना वेळेत बससेवा, स्थानक व गाड्यांच्या स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गावोगावच्या प्रवाशांना विशेषत: ज्येष्ठांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लालपरीचा मोठा आधार आहे. खासगी वाहने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसताना गावोगावी पोहचलेली आणि उन्हाळा असो वा पावसाळा, प्रवाशांना अविरतपणे सेवा देणारी लालपरी आता खडतर मार्गावरून प्रवास करीत आहे. सुमारे एक लाख कर्मचारी, १३ हजार बसगाड्या, त्याचे इंधन, देखभाल-दुरुस्तीवर दरमहा महामंडळाचा ७५० कोटींचा खर्च होत आहे. तर दुसरीकडे दरमहा लालपरीचे सरासरी उत्पन्न ६०० कोटींपर्यंतच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला सरकारच्या मदतीची वाट पाहवी लागते, अशी स्थिती आहे. जुनाट बसगाड्या, स्थानक व गाड्यांमधील अस्वच्छता, अवेळी धावणाऱ्या बसगाड्यांमुळे प्रवासी कमी झाल्याची स्थिती आहे. खासगी प्रवासी वाहनांशी स्पर्धा करताना आता लालपरीने देखील एक पाऊल पुढे टाकण्याचे नियोजन केले आहे. त्यातून उत्पन्न व खर्चातील तफावत कमी होईल, असा विश्वास महामंडळाला आहे.
प्रवाशांना लगेचच बस मिळेल
लालपरीचे प्रवाशी पुन्हा वाढावेत म्हणून आता प्रत्येक बस डेपो व तेथील स्वच्छतागृहे आणि बसगाड्यांची दररोज स्वच्छता केली जात आहे. तसेच नवीन ७०० बसगाड्या लवकरच परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील. प्रवाशांना वेळेत बस मिळाव्यात, त्यांना वाट पाहावी लागू नये, असे नियोजन केले जात आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
परिवहन महामंडळाची सद्यस्थिती
एकूण बसगाड्या
१३,०००
दरमहा सरासरी उत्पन्न
६०० कोटी
दरमहा अंदाजित खर्च
७५० कोटी
प्रवाशांची दरमहा संख्या
४०.१३ लाख
प्रवाशांना आता वेळेवर बस
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ५०० लालपरी भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ५०० लालपरी व २०० हिरकणी (निमआराम) गाड्या खरेदी केल्या असून कार्यशाळेत त्याची बांधणी सुरु झाली आहे. प्रवाशी वाढीसाठी नवीन बसगाड्या आणल्या आहेत. प्रवाशांना बसची वाट पाहायला लागू नये, खासगी वाहनातून प्रवाशी जावू नयेत, यासाठी आता प्रवाशांना वेळेत बसगाड्या मिळतील. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे व लातूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यात विशेष नियोजन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.