सोलापूर : विवाहापूर्वी सात जन्माच्या आणाभाका घेणाऱ्या ‘ती’चा पतीच्या घरी नववधू म्हणून गेल्यावर काही दिवसांतच स्वप्नांचा चुराडा होतो. हुंडा, विवाहातील मानपान, पैसा, स्वयंपाक येत नाही, सतत फोनवरच बोलते अशा कारणांतून विवाहितेचा छळ केला जातो. काही दिवस, महिने तो त्रास सोसूनही सासरच्यांकडून छळ सुरूच राहतो, अशावेळी ती पोलिस ठाण्यात धाव घेते. १ जानेवारीपासून जिल्ह्यातील एक हजार ५०३ महिलांनी सासरच्यांविरुद्ध पोलिस ठाण्यांचा दरवाजा ठोठावला आहे.
विवाहानंतर काही दिवसांतच किंवा अनेक वर्षे त्रास सोसूनही तो कमी होत नसल्याने विवाहिता थेट सासू, सासरा, दिर, पती यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेत आहे. सुरवातीला पोलिसांकडून भरोसा सेलच्या (महिला सुरक्षा कक्ष) माध्यमातून तक्रारदार महिलेचा त्रास देणाऱ्यांना बोलावून घेऊन समुपदेशन केले जाते. काहीवेळा असा प्रयत्न करून तो तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार जोडण्याचे मोठे काम पोलिस विशेषतः भरोसा सेलमधील महिला अंमलदार करतात.
१ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत शहर पोलिसांच्या भरोसा सेलने ५०४ महिलांचा संसार पुन्हा जुळवून दिला. तर ग्रामीण पोलिसांनी ११५ महिलांचा छळ थांबविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पण, अनेक महिन्यानंतरही सासरच्यांकडून होणारा छळ कमी न झाल्याने मागील दहा महिन्यांत ३०१ विवाहितांनी थेट कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातील अनेकांनी घटस्फोट देखील मागितला आहे. तर तीनशेहून अधिक महिलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्रास देणाऱ्या सासरच्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
१ जानेवारीपासूनची स्थिती
महिलांच्या एकूण तक्रारी
१,५०३
समुपदेशनानंतर समझोता
६६५
समुपदेशानंतरही न्यायालयात धाव
३०१
पोलिसांत गुन्हे दाखल
२८७
अंदाजे प्रलंबित प्रकरणे
२५०
बहुतांश तक्रारींचे स्वरूप
विवाहात तुझ्या आई- वडिलांनी आमचा व्यवस्थित मानपान केला नाही
तुझ्या माहेरच्यांनी महागड्या वस्तू, दागिने घातले नाहीत
नवीन घर घ्यायला, घर बांधायला, गाडी घ्यायला, कर्ज फेडायला माहेरून पैसे आण
सतत मोबाईल घेऊन बसते, मोबाईलवर सारखेच बोलत असते
स्वयंपाक नीट येत नाही, सकाळी झोपेतून लवकर उठत नाही, मुलगा पाहिजे तर मुलीच झाल्या
कौटुंबिक वादात महिलांना पोलिसांचा ‘भरोसा’
विवाहितांच्या संसारातील कौटुंबिक वाद मिटविण्यात पोलिस आयुक्तालयातील ‘भरोसा सेल’ची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. दरवर्षी शेकडो महिलांचे तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार जोडण्याचे काम आमचे अधिकारी, अंमलदार प्रामाणिकपणे करतात. अनेकदा विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्यांना बोलावले जाते, पण ते येत नाहीत. अशावेळी त्यांना कायद्याच्या भाषेत समजावून सांगून बोलावून तो वाद मिटविला जातो.
- धनाजी शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला सुरक्षा कक्ष, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.