सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे. सहा वर्षांपूर्वी इयत्ता पहिलीच्या वर्गात २५ लाख विद्यार्थी प्रवेश घ्यायचे, पण आता ही संख्या १९ लाखांवर आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २०१७-१८च्या संचमान्यतेच्या तुलनेत सहा हजार शिक्षक कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता नव्या पदभरतीत शिक्षकाला एकाच शाळेत तथा जिल्ह्यात कायमची नेमणूक देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यात जिल्हा परिषदांच्या ६४ हजार शाळा असून त्याअंतर्गत ६८ लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. पण, इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढलेला असतानाही त्या शाळांनी स्वत:मध्ये काहीच बदल केला नाही. दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदाच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या देखील कमी आहे.
२०१७ नंतर थेट २०२३मध्येच शिक्षक भरती होत आहे. दरम्यान, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूलबसची सोय केली आहे. पण, दूरवरून येणाऱ्यांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये तशी सोय नाही. स्पर्धेच्या युगात आपलीही मुले टिकावीत म्हणून पालक आता मुलांचे प्रवेश इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांमध्ये घेत आहेत. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या तब्बल १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या कमी झाल्याने त्या शाळांसाठी 'पानशेत समूह शाळा पॅटर्न राबविला जाणार आहे.
झेडपी शाळांमध्येही आता सेमी इंग्रजी
सध्या राज्यातील १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये देखील सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरु करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभाग करीत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
झेडपी शिक्षक भरतीची सद्य:स्थिती
संभाव्य शिक्षक भरती
२३,०००
उमेदवारांची नोंदणी
१.६५ लाख
स्व:प्रमाणीकरण केलेले उमेदवार
१.५६ लाख
बिंदुनामावली अंतिम जिल्हे
१५
शिक्षकांची आंतरजिल्हा बदली यापुढे बंद
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली) बदलीची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून पार पाडली जाते. मात्र, या ऑनलाइन बदली प्रक्रियेत यंदा अनेक जिल्हा परिषदांना त्यांच्याकडून गेलेल्या प्रमाणात शिक्षकच मिळाले नाहीत. पटसंख्या कमी व्हायला हेदेखील प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे जून महिन्यातील शासन निर्णयानुसार यापुढे नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. त्यांना ज्याठिकाणी नेमणूक मिळाली, त्याच शाळेत किंवा त्याच जिल्ह्यात सेवानिवृत्त होईपर्यंत काम करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.