सोलापूर : कॉलेजला न जाता रेल्वेने मुंबईला गेलेल्या सोलापूर शहरातील दोन मुलींना जेलरोड व विजापूर नाका पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत शोधले. वाशी रेल्वे स्थानकावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
महाविद्यालयात पेपर सुरू असल्याने रिक्षाचालक वडिलाने त्यांच्या इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलीला २८ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शाळेबाहेर सोडले. पण, दुपारनंतर तिच्या एका मैत्रिणीने पेपरसाठी नसलेल्या मैत्रिणीबद्दल फोन करून विचारणा केली. त्यावेळी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची खात्री रिक्षाचालकास पटली. त्यांनी तातडीने जेलरोड पोलिस ठाणे गाठले. त्याचवेळी आपल्या मुलीची एक मैत्रीण देखील बेपत्ता झाल्याचे त्यांना समजले.
जेलरोड पोलिसांनी विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने त्या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी सूत्रे हलविली. त्या मुली सोलापूर रेल्वे स्थानकावरून पुण्याला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आणि पोलिसांना तपासाचा एक धागा मिळाला. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावरील फुटेज पाहून त्या मुंबईच्या दिशेने गेल्याची खात्री केली. खबऱ्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. पोलिस उपनिरीक्षक विनय जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या दोघींना वाशी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आणि सोलापूरला आणले. दोन्ही अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांना पालकांकडे सोपविले.
पळालेल्या मुलींशी जवळीकता साधणारा जेरबंद
रेल्वेने मुंबईत गेल्यावर स्थानकावर बसलेल्या मुलींशी बोलून एका तरुणाने त्यांना नोकरी व राहण्याची सोय करतो म्हणून अमिष दाखविले. त्यानंतर त्यांना तो हज हाऊस येथे घेऊन गेला. पण, त्यांनी ओळखपत्र न दिल्याने त्यांना त्याठिकाणी थांबता आले नाही. त्यामुळे तो तरुण दोन्ही मुलींना घेऊन मरीन ड्राईव्हला आला आणि त्याठिकाणी एका मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर मुंबई रेल्वे स्थानकावरून वाशीला घेऊन आला. त्यावेळी खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली आणि पुढे काही अनुचित घडण्यापूर्वीच पोलिसांनी संशयित तरुणासह मुलींना ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.