सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे व भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या मुख्य लढतीत या मतदारसंघातील तब्बल १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यातील १६ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. दुसरीकडे माढ्यातील धैर्यशिल मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील लढतीत अपक्ष ३० उमेदवारांना डिपॉझिट वाचविता आले नाही. त्यातील २१ उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत एकूण २१ तर माढा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत उमेदवारांना डिपॉझिट वाचविण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षटांश मते आवश्यक होती. मात्र, मुख्य उमेदवारांच्या लढतीत दोन्ही मतदारसंघातील ४९ उमेदवारांना डिपॉझिट वाचविता आले नाही.
माढ्यातून वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर यांनी २० हजार ५१९ तर रामचंद्र घुटुकडे यांना ५८ हजार ३४४ मते घेतली. याशिवाय स्वरूप जानकर यांना सात हजार ३६, प्रा. लक्ष्मण हाके यांना पाच हजार ८३, सिताराम रणदिवे यांना चार हजार ९८०, धनाजी मस्के यांना चार ४३३, संतोष बिचुकले यांना चार हजार ३९ मते मिळाली आहेत. सोलापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार अशिष बनसोडे यांना दहा हजार ५०७, रमेश बिचुकले यांना तीन हजार १४६, श्रीविद्या दुर्गादेवी यांना तीन हजार ४९३, प्रा. अर्जुन ओव्हाळ यांना दोन हजार ६५४ मते मिळाली आहेत. माढ्यातून ‘नोटा’ला तीन हजार ६५५ तर सोलापुरातून नोटाला दोन हजार ७२५ मते मिळाली आहेत.
माढ्यात नुसत्या तुतारीला ५८३४४ मते
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशिल मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी वाजवत असलेला व्यक्ती या चिन्हावर निवडणूक लढविली. नवीन चिन्ह असल्याने प्रत्येक नेत्यांनी या चिन्हाचा जोरदार प्रचार करीत मतदारांमध्ये ते चिन्ह बिंबवले. पण, याच मतदारसंघातून रामचंद्र घुटुकडे यांचेही चिन्ह तुतारीच होते. मात्र, ती नुसती तुतारी होती. त्यांनी केलेला प्रचार, प्रचारातील मुद्दे व त्यांचे तुतारी चिन्ह, यातून त्यांना अन्य ३० उमेदवारांमध्ये सर्वाधिक ५७ हजार ८९३ मते मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.