अबब..! रस्ते अपघातात दररोज ४३ मृत्यू; ११ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा

राज्यात दररोज रस्ते अपघातात सरासरी ४३ जणांचा मृत्यू होत असून जानेवारी ते जून या सहा महिन्यांत पावणेआठ हजार अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर या ११ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरला आहे.
road accident
road accidentsakal
Updated on

सोलापूर : रस्ते वाहतूक वेगवान व्हावी म्हणून राज्यात महामार्गांचे जाळे उभारले जात आहे. प्रत्येक महामार्गांवर वाहनांचा वेग मर्यादित केला, तरीपण वाहनचालकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे राज्यात दररोज रस्ते अपघातात सरासरी ४३ जणांचा मृत्यू होत असून जानेवारी ते जून या सहा महिन्यांत पावणेआठ हजार अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर या ११ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरला आहे.

वाहनांचा अतिवेग आणि दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसणे, मद्यपान करून वाहन चालविणे, लेन कटिंग, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे हीच अपघाताची प्रमुख कारणे आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही काही अपघात व मृत्यू झाले आहेत. अपघातप्रवण ठिकाणांची नादुरुस्ती, रस्ते उभारणीतील चूका, यामुळेही अपघात वाढल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. अपघात रोखणे, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या हेतूने दरमहा रस्ता सुरक्षा समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. खासदारांनी दर तीन महिन्याला रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेऊन प्रशासनाला उपाययोजना सूचविणे आवश्यक आहे. पण, बऱ्याच खासदारांनी दोन-अडीच वर्षांत बैठकच घेतलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही अधिकारी केवळ कागदावरच उपाययोजना करीत असल्याची स्थिती अपघात व अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. सहा महिन्यांत पुणे व नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बाराशे जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, सातारा, नगर, औरंगाबाद, सोलापूर व नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २०७ ते ३८३ जणांचा मृत्य झाला आहे.

साडेचार वर्षांत ५९ हजार मृत्यू

२०१८ ते जून २०२२ या साडेचार वर्षांत राज्यातील रस्ते अपघातात तब्बल ५९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेकांच्या चिमुकल्याचा पिता, नवविवाहितेचा पती, वयस्क माता-पित्यांचा व समाजातील उपेक्षितांचा आधार गेला आहे. विशेष म्हणजे त्या साडेचार वर्षांत राज्यातील विविध महामार्गांवर एक लाख ४९ हजार ३१४ अपघात झाले आहेत. त्यात तब्बल ७८ हजार जण गंभीर जखमी झाले असून त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर काहींचा हात किंवा पाय तुटल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

साडेचार वर्षांतील रस्ते अपघात

सन अपघात मृत्यू जखमी

२०१८ ३५,७१७ १३,२६१ २०,३३५

२०१९ ३२,९२५ १२,७८८ १९,१५२

२०२० २४,९७१ ११,५६९ १३,९७१

२०२१ २९,४९३ १३,५२८ १६,०७८

जून २०२२ २६,२०८ ७,७४० ८,९९३

एकूण १,४९,३१४ ५८,९२५ ७८,५२९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.