सोलापूर : पंढरपूर येथे २९ जूनला आषाढी वारीचा सोहळा रंगणार असून त्यासाठी १६ ते १८ लाख वारकरी येतील, असा अंदाज आहे. वारकऱ्यांना चंद्रभागा स्नानाची पर्वणी साधता यावी यासाठी उजनी धरण मायनस असतानाही बुधवारी (ता. २१) साडेचार हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शनिवारी (ता. २४) पंढरपुरात पोचेल, असे नियोजन आहे.
आषाढीसाठी उजनीतून पाणी सोडण्यात आले असून त्यासाठी चार दरवाजे उघडण्यात आले आहे. वास्तविक पाहता चार दरवाजातून सहा हजार क्युसेक पाणी सोडता येते. सध्या साडेचार हजार क्युसेक पाणी सोडले गेले आहे. सुरवातीला आज सकाळ नऊ वाजता तीन हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो विसर्ग वाढवून साडेचार हजार क्युसेक करण्यात आला.
नदी काठावरील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पंढरपुरात पाणी पोचल्यावर धरणातून सुटणारा प्रवाह एक हजार क्युसेक केला जाणार आहे. वारीच्या काळात २९ जूनपर्यंत तेवढा विसर्ग कायम ठेवला जाणार आहे. वारीनंतर ३० जूनपासून उजनीतील विसर्ग वाढवून सहा हजार क्युसेक केला जाणार आहे. ६ जुलैपर्यंत भीमा नदीतून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचणार आहे. सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी ७ जुलैपासून बंद करण्यात येईल. त्यानंतर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव राहील, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या धरणातील पाणीसाठा मायनस ३० टक्क्यांपर्यंत खाली गेला असून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी बंद केल्यानंतर धरण मायनस ४० ते ४४ टक्क्यांवर पोचणार आहे. पाऊस आणखी लांबल्यास धरणातील पाणी खूप जपून वापरावे लागेल, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘चिंचपूर’ची महापालिकेने घेतली जबाबदारी
वर्षानुवर्षे चिंचपूर बंधाऱ्याची जबाबदारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडेच होती. त्यावरील औज बंधाऱ्याचे व्यवस्थापन महापालिकेकडे होते. पण, बुधवारी (ता. २१) लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आता चिंचपूर बंधाऱ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आम्हीच घेऊ, असे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पष्ट केले. त्यातून आता चिंचपूर बंधाऱ्याचे लिकेज, प्लेटा टाकण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.