सोलापूर : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, उद्यापासून (शनिवार) गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता असून, हा उत्सव शांततेत व आनंदात पार पडावा, यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीला बंदोबस्तासाठी १६०० होमगार्ड नेमले आहेत. याशिवाय शहर-जिल्ह्यात प्रत्येकी एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी बोलावण्यात आली आहे.
यंदाचा गणेशोत्सव ७ ते १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद आहे. दोन्ही उत्सवाचे पावित्र्य राखले जावे, कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, यादृष्टीने उत्सव साजरा व्हावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियातून प्रसारित होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास न ठेवता, त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. मिरवणुकीत डिजे किंवा मोठ्या आवाजाची वाद्ये वापरता येणार नाहीत, दोन बेस, दोन टॉपसाठीच परवानगी राहील. पण, त्याचाही आवाज मर्यादित असणे जरुरी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचविणारी कृती खपवून घेतली जाणार नाही, संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. शहरात ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे.
शहरात पोलिसांचे नियोजन
शहरातील ६९ ठिकाणी पोलिसांचे असतील २४ तास फिक्स पॉइंट
सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत दररोज ‘ऑपरेशन ऑल आउट
७ ते १७ सप्टेंबरपर्यंत शहरात असणार पोलिसांचा बंदोबस्त
शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची ५ पथके तर दामिनी पथकांसह बीट मार्शलची राहणार गस्त
१२ सप्टेंबरला घरगुती गणेश विसर्जन, त्या दिवशी शहरात ठिकठिकाणी असतील मूर्ती संकलन केंद्रे
सोशल मीडियावरील पोस्ट, मेसेजवर सायबर पोलिसांचे असणार लक्ष
शहरातील मुख्य बाजारपेठांमधील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर, चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके
शहरात पोलिसांचा बंदोबस्त
पोलिस अधिकारी, अंमलदार : २,३००
होमगार्ड : ५००
बाहेरील बंदोबस्त : १ एसआरपीएफ तुकडी, ५० अंमलदार व अधिकारी
----------------------------------------------
ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त
पोलिस अधिकारी-अंमलदार : २,५००
होमगार्ड : १,१००
बाहेरील बंदोबस्त : १ एसआरपीएफ तुकडी (३ प्लाटून)
ग्रामीणमध्ये २८२८ मंडळांनी घेतला परवाना
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत दोन हजार ८२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांकडून परवाना घेतला आहे. पोलिसांच्या प्रयत्नातून यावर्षी जिल्ह्यातील २६८ गावांमध्ये एक गाव एक गणपती असणार आहे. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या राज्य राखीव पोलिस बदलाच्या तीन प्लाटून अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर येथे तैनात असणार आहेत. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, ९ पोलिस उपअधीक्षक, २५० पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव आनंदात व शांततेत पार पडेल, असे नियोजन आहे.
सर्वांनी आनंदात व शांततेत साजरा करावा गणेशोत्सव
गणेशोत्सवासाठी सोलापूर शहरात पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला असून, गणेशमूर्ती विक्रीची ठिकाणे, विसर्जन ठिकाणीही बंदोबस्त असेल. उत्सव हा आनंदाचा असतो, त्यामुळे कोणीही त्याला गालबोट लागेल असे कृत्य करू नये. कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी.
- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.