वडाळा : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे- पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. आंदोलनाच्या माध्यमातून ते घराघरात पोचले. आता त्यांची क्रेझ शाळा- महाविद्यालयातही पहायला मिळत आहे. इयत्ता बारावीच्या सहामाही परीक्षेतील राज्यशास्त्राचा पेपर सोडविताना बीबी दारफळ येथील विद्यार्थ्याने ‘एक मराठा एक कोटी मराठा’ अशी सुरुवात करूनच उत्तरपत्रिका सोडविली आहे.
बी.बी. दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील आदर्श शिक्षण मंडळ बीबीदारफळ प्रसारक संचलित. श्री गणेश विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात संकेत लक्ष्मण साखरे (वय १९) हा बारावीत शिक्षण घेत आहे. त्याने सहामाहीचा पेपर सोडविताना उत्तरपत्रिकेची सुरवात चक्क ‘एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली.
बी. बी. दारफळ येथील संकेत लक्ष्मण साखरे याचा गुरुवारी (ता. २) सहामाही परीक्षेचा राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. पेपरची सुरुवातच त्याने ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली. त्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हो आहे.
नोकरीसाठी आयटीआयनंतर बारावीत प्रवेश
संकेत साखरे या विद्यार्थ्याने दहावीनंतर आयटीआय शिक्षण घेतले आहे. तो सध्या लोकमंगल डिस्टलरी या प्रकल्पात कामगार म्हणून काम करीत आहे. शिक्षणाची इच्छा असल्याने तो काम करून बी.बी. दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे शिक्षण घेत आहे. २००८ मध्ये वडिलांचे छत्र हरपले. सध्या त्याच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहेत.
शेती अडचणीत, नोकरी नाही, करायचे काय...
मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क मिळूनही चांगली नोकरी मिळत नाही. शेती केली तरी शेतीतून शाश्वत उत्पन्न येत नाही. शेतमालाचे भाव चढ-उतार यामुळे शेती तोट्यात जाते. शेतजमीन असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी इतरत्र काम करावे लागते, अशी खंत संकेत साखरे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास आमची परवड थांबेल, अशी आशाही त्याने यावेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.