सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघाच्या मैदानात सद्य:स्थितीत तब्बल ३३३ उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सोमवारचाच (ता. ४) दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी यातील कितीजण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण, प्रत्येक उमेदवाराला त्या मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एक षष्टांश (उदा. एकूण मतदानातील एक लाख ८० हजार मते वैध असल्यास त्यापैकी ३० हजार मते पडायलाच हवीत) मते घ्यावीच लागतील, अन्यथा त्यांना डिपॉझिट परत मिळणार नाही.
जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीमध्ये तृतीयपंथी मतदार ३१० आहेत. त्यात माढा मतदारसंघात अवघे तीन तर सांगोल्यात पाच तृतीयपंथी आहेत. २०१९च्या निवडणुकीत ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते, यंदा त्यात वाढ होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. या निवडणुकीत अपक्षांची संख्या जास्त राहिल्यास ज्या उमेदवाराला ७० हजारांपर्यंत मते मिळतील तो विजयी होऊ शकतो. पण, मतदान किती टक्के होते आणि निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार, यावर ते समीकरण अवलंबून असणार आहे. २०१९च्या निवडणुकीसाठी एकूण ३३ लाख ९१ लाख ८१४ इतके मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीत ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत चार लाख ५७ हजार ५५ मतदार वाढले आहेत. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदार
मतदारसंघ पुरुष महिला एकूण
करमाळा १,७१,५१५ १,५७,४६८ ३,२८,९९४
माढा १,८३,९४८ १,६८,७४० ३,५२,६९१
बार्शी १,७३,४५३ १,६४,००२ ३,३७,४९९
मोहोळ १,७३,१२१ १,५८,३२९ ३,३१,४५८
शहर उत्तर १,६२,४६७ १,६६,०५९ ३,२८,५७२
शहर मध्य १,७०,५०९ १,७६,११५ ३,४६,६७७
अक्कलकोट १,९६,५७७ १,८६,९६४ ३,८३,४७९
दक्षिण सोलापूर १,९५,७५१ १,८६,९६४ ३,८२,७५४
पंढरपूर-मंगळवेढा १,९१,४६४ १,८२,१९४ ३,७३,६८४
सांगोला १,७२,७०४ १,६०,७८४ ३,३३,४९३
माळशिरस १,८०,३२२ १,६९,२१४ ३,४९,५६८
एकूण १९,७१,८३१ १८,७६,७२८ ३८,४८,८६९
उमेदवारांकडून मतदार यादीचा अभ्यास
लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांकडे मतदान कार्ड असताना देखील मतदार यादीत नावे नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक उमेदवारांनी स्वतःहून विभागनिहाय मतदार यादी तयार करून आपल्या विश्वासातील कार्यकर्त्यांकडे दिली आहे. आपल्याला खात्रीने पडणाऱ्यांची नावे त्यात आहेत की नाही, याची शहानिशा केली जात आहे. याशिवाय आपल्याला मागच्या निवडणुकीत कोणत्या ठिकाणी कमी मतदान झाले होते असे भाग काढून त्याठिकाणी पोचण्याचे नियोजनही उमेदवारांनी केले आहे.
उमेदवारांना प्रचारासाठी १५ दिवसांचा अवधी
सोलापूर : निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांच्या गावागावात प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. उमेदवारांनी पाच वर्षांत केलेल्या कामांवर व एकूण आणलेल्या निधीवर गाणी तयार केली आहेत. त्याचाही आवाज घुमणार आहे. रात्री दहानंतर प्रचाराच्या तोफा थंडावतील. जिल्ह्यातील बहुतेक उमेदवारांनी प्रचारासाठी आणि निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रांपर्यंत आणण्यासाठी वाहनांची आतापासूनच व्यवस्था करायला सुरवात केली आहे. त्यामुळे खासगी प्रवाशांच्या शोधात दिवसभर वणवण फिरणाऱ्या वाहनचालकांना यातून मोठा रोजगार मिळणार आहे. याशिवाय उमेदवारांचे पॅम्प्लेट, चिन्हांचा घरोघरी प्रचार करण्यासाठी देखील कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकांनी अशा कार्यकर्त्यांसाठी दररोज रोजगार देण्याचीही व्यवस्था केल्याचे बोलले जात आहे. या काळात गावागावातील हॉटेल व्यवसायिकांचा व्यवसाय देखील वाढणार आहे.
गावागावातील कार्यकर्ते ॲक्टिव्ह
पाच वर्षे आमदार किंवा त्यांच्या भागातील नेत्यांकडे विविध कामे घेवून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आता निवडणुकीत आपला उमेदवार विजयी होण्यासाठी त्यांना झटून काम करावे लागणार आहे. गावागावात आता त्यांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले जात आहे. दुसरीकडे प्रचारासाठी किंवा उमेदवाराकडे जाणाऱ्या प्रत्येकाच्या चहापानाची स्पेशल व्यवस्था देखील करण्याचे नियोजन सुरू झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.