आषाढी एकादशीनिमित्त मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. यंदा आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजा नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबानं केली.
नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब 16 वर्ष नित्यनियमानं पंढरीची वारी करतंय. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, असं विठुरायाचरणी साकडं घातलं.
पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्यने पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संतांच्या पालख्या देखील मोठ्या संख्येने पंढरपुरात पोहोचल्या आहेत.
आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी (16 जुलै) पंढरी नगरीत जवळपास 12 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. आज ही संख्या वाढली झाली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागा भाविकांनी भरली आहे.