पावसाचा जोर वाढणार
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केला. ऑगस्टमध्ये देशात सरासरी (९४ ते १०६ टक्के) पावसाचा अंदाज आहे. थोडक्यात, उर्वरित हंगामाचा विचार करता ऑगस्ट महिन्यात कमी, तर सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील दोन्ही महिन्यात देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. पूर्वोत्तर राज्ये, लगतच्या पूर्व भारतातील राज्ये, लडाख, सौराष्ट्र, कच्छ, मध्य आणि दक्षिण द्विपकल्पाचा तुरळक भाग वगळता देशात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
ऑगस्टमध्ये गाठणार सरसरी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये पाऊस काहीशी उसंत घेण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी देशात सरासरीइतका ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० कालावधीत ऑगस्टची पावसाची दीर्घकालीन सरासरी २५४.९ मिलिमीटर आहे. ऑगस्टमध्ये हिमालयाचा पायथा, पूर्व मध्य भारत, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य भारताचा दक्षिण भाग, पूर्व भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.
ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता
जुलै महिन्यात समाधानकारक बरसणारा मॉन्सून ऑगस्टमध्ये काहीसा रुसण्याचे संकेत आहेत. ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचे पुनरागमन होईल.
ला-निना’चे संकेत
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसाधारण एल-निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टीमनुसार मॉन्सून हंगामात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. भारतीय समुद्रात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सर्वसाधारण स्थितीत आहे. उर्वरित मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहील.
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया.
पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. उद्या (ता. २) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, विदर्भात तुरळक जोरदार पावसाची पावसाची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.