१४३७ एकर जमिनीचे संपादन, १२० कोटींचा खर्च, तरीपण बोरामणी विमानतळ अशक्य! सोलापूरकरांची आशा होटगी रोड विमानतळावर

बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ १४ वर्षानंतरही कागदावरच असून निर्वनीकरणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाने तो प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर फेर प्रस्ताव सादर झाला नाही. आता होटगी रोड विमानतळाचीच सोलापूरकरांना आशा आहे.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मागील १४ वर्षानंतरही कागदावरच असून निर्वनीकरणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. केंद्राच्या नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाने तो प्रस्ताव फेटाळला असून त्यानंतर फेर प्रस्ताव सादर झालेला नाही. त्यामुळे आता होटगी रोड विमानतळाचीच सोलापूरकरांना आशा आहे.

बोरामणी विमानतळासाठी तत्कालीन राज्य सरकारने काही खासगी जमीन संपादनासाठी काही प्रमाणात निधी देखील दिला होता. मात्र, निर्वनीकरणाचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. बोरामणी विमानतळासंदर्भात शासन स्तरावरून अनास्था दिसून येते. सोलापूर जिल्ह्यासाठी विमानतळ असणे काळाची गरज ओळखून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले.

होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत ९२ मीटर चिमणी पाडल्यानंतर दोन ते सहा महिन्यात विमानसेवा सुरू होईल, अशी चर्चा झाली. तरीदेखील विमानसेवा नेमकी कधीपासून सुरू होईल यासंदर्भात मतमतांतरे आहेत. अजूनही धावपट्टीचे काम पूर्णपणे झालेले नाही. अंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची सोय, अशी कामे पूर्ण झाल्यावर त्याची पडताळणी होईल. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही होणार आहे, पण त्यासाठी नेमका किती कालावधी लागणार, बोरामणी विमानतळ सुरू होईल की नाही, यासंदर्भातील उत्तरे अजूनही स्पष्टपणे सोलापूरकरांना मिळालेली नाहीत. त्यासंदर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधींना बोलावेच लागेल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.

१४३७ एकर जमीन संपादित, पुढे काय?

बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा निर्णय डिसेंबर २००८ रोजी झाला. जानेवारी २००९ नंतर विमानतळासाठी जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरू झाली. आतापर्यंत या विमानतळासाठी तब्बल ५७५ हेक्टर (१४३७ एकर) जमिनीचे संपादन झाले असून त्यासाठी अंदाजे १२० कोटींपर्यंत खर्च झाला आहे. खासगी जमिनीचे संपादन होत असतानाच त्या परिसरातील वन विभागाच्या जमिनीच्या संपादनाचा विषय मार्गी लागला नाही. सध्या या विमानतळासंदर्भातील पुढील सर्व कार्यवाही ठप्प असल्याची सद्य:स्थिती आहे.

चंद्रपूर, सोलापूर विमानतळ निर्वनीकरणात अडकले

सोलापूर जिल्ह्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नागपूर येथील वन विभागाच्या सचिवांकडे निर्वनीकरणासंदर्भातील फेर प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली आहे. पण, त्यावर अजूनपर्यंत होकार आलेला नाही. विमानतळाच्या जागेशेजारील माळढोक अभयारण्य व परदेशी पक्षांचा थांबा आणि जवळच पुणे, विजयपूर व कलबुर्गी विमानतळ असल्याने निर्वनीकरण होईल की नाही, यांसदर्भात अधिकाऱ्यांनीही तोंडावर बोट ठेवले आहे. दुसरीकडे खुद्द राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील विमानतळ देखील निर्वनीकरणामुळेच रखडल्याची वस्तुस्थिती आहे.

निर्वनीकरणाचा फेर प्रस्ताव नाही

बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनीत काही जमीन वन विभागाकडील आहे. त्यासंदर्भातील निर्वनीकरणाचा प्रस्ताव नागपूरच्या कार्यालयास पाठविला होता. पण, तो फेटाळल्यानंतर पुन्हा फेर प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झालेला नाही.

- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.