सोलापूर : कोरोना काळात शाळा-महाविद्यालये बंद राहिल्याने मुलांना मित्रांचा सहवास मिळाला नाही, मैदानी खेळही बंद राहिले. अनेकांना व्यवसायात नुकसान झाले व कर्जबाजारीपणा वाढला, रोजगार गेला, आई-वडिल दोघेही जॉबला व मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यातून दोघांमधील सुसंवाद कमी झाला, अशा कारणांतून एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२३ या काळात नैराश्यातून राज्यातील तब्बल दोन हजार ७६३ जणांनी जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक बाब राज्याच्या मानसिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.
राज्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. कोरोनातून बाहेर पडताना अनेकांना जगणे मुश्किल झाले असून ताणतणाव, नैराश्यात वाढ झाली आहे, विशेषत: तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘मनशक्ती केंद्र’ बनवून त्याठिकाणी अशा लोकांचे मेडिटेशन, प्राणायाम, योगाच्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे. दुसरीकडे ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर या प्रादेशिक मनोरुग्णालयाशिवाय कोल्हापूर व जालन्यातही प्रादेशिक मनोरुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दहा खाटा खास मनोरुग्णांसाठी राखीव ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये योगा शिक्षकाची नेमणूक करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच जालना, कोल्हापूर, ठाणे येथील मनोरुग्णालयाचा विस्तार करण्याचाही निर्णय झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ५ दिवसांत ४ आत्महत्या
भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील आकाश राजकुमार पुजारी (वय १८) हा मुलगा इयत्ता बारावीत शिकत होता. दिनेश कांतीलाल परब (वय १७) या तडवळे (ता. माढा) येथील अल्पवयीन मुलानेही आत्महत्या केली. शांतलिंग गुरुलिंगप्पा स्वामी (वय १७, रा. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर) आणि पृथ्वीराज गणपतसिंग चव्हाण (वय १६, रा. अरविंद धाम) या अल्पवयीन मुलांनीही वेगवेगळ्या कारणातून आत्महत्या केल्या आहेत. पाच दिवसांत चार अल्पवयीन मुलांच्या आत्महत्यांमुळे संपूर्ण जिल्हा हादरल्याची स्थिती आहे.
मनोरुग्णांसाठी ‘मानस’ टेलिकॉम सेवा
राज्यातील मानसिक आजाराच्या व्यक्तींचे समुपदेश करून त्यांची मनशक्ती वाढविण्यासाठी देशपातळीवर ‘मानस’ टेलिकॉम सेवा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी ६२ समुपदेशक (मानसोपचार तज्ज्ञ) नेमले असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाचे समुपदेशन केले जात आहे. नागरिकांसाठी १४४१६ हा टोल फ्रि क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोरोनानंतर ‘मानसिक’ सल्ला घेतलेले
सन व्यक्तींची संख्या
२०२०-२१ १,०५,२३५
२०२१-२२ ३,२९,४०८
२०२२-२३ ९,६६,५५५
एकूण १४,०१,१९८
नैराश्याची प्रमुख कारणे
- कर्जबाजारीपणा
- बेरोजगारी
- नापिकी (नैसर्गिक आपत्ती)
- व्यसनाधिनता
- दुर्धर आजार व मानसिक समस्या
- कौटुंबिक कलह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.