अकोला: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा मंगळवारी (ता. २) केली. इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केले.
‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम २ मे रोजी मुंबईत पार पडला. त्यावेळी शरद पवार यांनी या घोषणा केल्या. त्यांच्या घोषणेनंतर कार्यकर्ते, नेते अतिशय भावूक झाले. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देत साहेब आम्हाला पोरकं करून जाऊ नका, अशी भावनिक मागणी केली.
शरद पवार साहेबांनी राजकीय निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्यास पक्षाला सतत बळ मिळत राहिल व पक्ष मजबूत राहिल. त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची राष्ट्रवादीलाच नाही तर देशाला गरज आहे.
- संग्राम भैय्या गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अकोला
शरद पवार साहेबांनी आज दोन निर्णय जाहीर केले. त्यामध्ये पहिला, पक्षप्रमुख पदावरून निवृत्ती घेण्याचा व कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर दुसरा निर्णय दिला की, आगामी दोन तीन दिवसात पहिल्या निर्णयावर फेरविचार करेल. आम्ही मनोमन एवढेच चाहतो की, साहेबांनी योग्य तोच निर्णय घ्यावा आणि साहेब जो निर्णय देतील तो एक निष्ठावान पक्षकार्यकर्ता म्हणून मला आणि असंख्य लोकांना मान्य राहील.
- डॉ. संतोषकुमार कोरपे,
अध्यक्ष, दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावं असं माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. घरात मोठा माणूस बसलेला असला की, सर्व कुटुंबाला आधार वाटतो, तसे पवार साहेब अध्यक्षपदावर असल्यास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आधार वाटतो, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. पक्षाचा आधारवड म्हणजे शरद पवार साहेब.
- शिरीष धोत्रे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला
शरद पवार जानते नेते व पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी जर त्यांची निवृत्ती जाहीर केली असेल तर, त्यांच्या डोक्यात काही नवीन व महत्त्वाच्या कल्पना असतील किंवा नवीन दमाच्या लोकांना संधी द्यायची असेल, त्यादृष्टीकोनातून त्यांनी विचारपूर्वक उचललेलं हे पाऊल असेल. त्यांनी राजीनामा दिला तरी तेच प्रमुख मार्गदर्शक राहतील, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पक्ष चालूच शकत नाही.
- कृष्णा अंधारे, प्रदेश संघटक सचिव, महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस
आहेत त्याच पदावर शरद पवार साहेबांनी राहावे. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादी पक्षाची धुरा कोणी ओढू शकणार नाही. ते जोपर्यंत आहेत तोपर्यंतच राष्ट्रवादी पक्ष आहे. राजकारण, समाजकारण, अर्थ, साहित्य, सहकार किंवा इतरही सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञांशी साहेबांचा अत्यंत जवळचा संबंध असून, सर्वांचा विश्वास साहेबांवर आहे.
- प्रा. विश्वनाथ कांबळे, चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.