संघटनेच्या मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसांच्या आत मंत्रालयात बैठक घेऊन मागण्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
सातारा : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कऱ्हाड ते मंत्रालय ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा सहकारमंत्री अतुल सावे (Atul Save) व प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या आश्वासनानंतर साताऱ्यातून स्थगित करण्यात आली.
येत्या १५ दिवसांच्या आत मंत्रालयात बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, पदयात्रा साताऱ्यात येताना श्री. खोत (Rayat Kranti Sanghatana) यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवराज पंपाजवळ महामार्गावर ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटरचे अंतर कमी करावे, ऊस वाहतूकदारांचे मुकादमांनी बुडवलेले पैसे परत मिळावेत, आठवडी बाजार सुरू करावेत, गुजरातच्या धर्तीवर उसाला चार हजार रुपये दर द्यावा, कृषी कर्जासाठी सिबिलची सक्ती रद्द करावी, तुकडे बंदी कायदा रद्द करावा, शेतकऱ्यांना शेतमाल कोठेही विकता यावा, गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा आदी मागण्यांच्या माध्यमातून सरकारला जागे करण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळास अभिवादन करून पदयात्रा काढली होती.
काल या यात्रेचे साताऱ्यात आगमन झाले. खिंडवाडीतून यात्रा महामार्गाच्या कडेने शिवराज पेट्रोल पंपाजवळ आली. या वेळी सदाभाऊंसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत महामार्गावर ठिय्या मारला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिस अधिकाऱ्याने सदाभाऊंपुढे हात जोडले. त्यानंतर पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली. बॉम्बे चौकातून यात्रा पोवई नाक्यावर आली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आता सरकारपर्यंत आमच्या मागण्या न गेल्यास आम्ही वाहनाने मुंबईपर्यंत जाणार असून, सरकारमधील काही मंत्री आमच्याशी चर्चा करण्यासाठी येत असून, त्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, असे सदाभाऊ यांनी सांगितले. त्यानंतर सहकारमंत्री अतुल सावे आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत सदाभाऊ खोत व संघटनेचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसांच्या आत मंत्रालयात बैठक घेऊन मागण्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. आता सरकार आपल्या दारी ही शासनाची योजना राज्यभर सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत आपल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे, आमदार प्रवीण दरेकर यांनी श्री. खोत यांना दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.