Maharashtra Agriculture Day : शेतकरी आहात? तुमचं भविष्य उज्वल असेल; फक्त 'या' गोष्टी करा

काही गोष्टी लक्षात घेतल्या तर शेती व्यवसाय सुकर करता येईल
Maharashtra Agriculture Day
Maharashtra Agriculture DaySakal
Updated on

आज महाराष्ट्र शेतकरी दिवस. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी चांगला काळ असू शकतो फक्त काही गोष्टींचे पालन शेतकऱ्यांनी केले पाहिजे.

सगळे व्यवसाय बंद पडले तरी शेती कधीच बंद पडू शकत नाही याचा अनुभव कोरोना काळात आपल्या सर्वांना आला असेल. शहरात राहणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर अनेकजण गावाकडे आले होते. त्यानंतर काही लोकांनी शेतीमध्ये गुंतवणूक करणे सुरू केली. तर काहींनी थेट शेती व्यवसायच सुरू केला. पण शेतकऱ्यांनी आपलं भविष्य उज्वल करायचं असेल तर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

पारंपारिक शेती सोडून आधुनिकतेची कास

पारंपारिक शेतीमध्ये अनेक शेतकरी आपल्याला लागणाऱ्या धान्यांची किंवा पिकांची लागवड करतात. पण सध्या बरेच शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहतात. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. बदलती पीकपद्धती, नगदी पिके, कडधान्ये, कमी वेळेत येणाऱ्या पिकांच्या लागवडीचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. त्याचबरोबर जोडव्यवसाय आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती अजून सुकर होईल.

Maharashtra Agriculture Day
Buldhana Bus Accident : बुलढाणा भीषण अपघातावर PM मोदींनी व्यक्त केला शोक; जाहीर केली मदत

शेतीपुरक व्यवसाय

प्रत्येक शेतकऱ्यांचे एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत असणे गरजेचे आहे. शेतीसोबतच शेळीपाळन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, भाजीपाला विक्री, आठवडे बाजारांत शेतीची मालाची विक्री असे शेतीपूरक व्यवसाय असणे गरेजेचे आहे. प्रत्येक वेळी शेतीतील पीक आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नसल्यामुळे अशा वेळी हे उत्पन्न आपली गरज भागवू शकते.

त्याचबरोबर शेतीमध्ये गवत, तण, कडबा किंवा पीकाचे उरलेले अवशेष प्राणी खात असतात म्हणून शेतीसोबतच दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन व्यवसायांसारख्या पूरक व्यवसायात मदत होते.

शेतीतील उद्योगांची साखळी पूर्ण होणे गरजेचे

शेती करत असताना प्रत्येक घटक कामी येईल याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. जर आपल्याकडे शेती असेल तर त्यातील गवत खाण्यासाठी प्राण्यांची आवश्यकता असते. त्याचबरोबर शेळीपालन व्यवसायात हरभरा, सोयाबीन, गहू या पिकांचा भुसा शेळ्यांना खाण्यासाठी लागतो, शेळ्या किंवा जणावरांचं खाऊन झाल्यावर गावरान कोंबड्या त्यातील पदार्थ वेचून खात असतात. त्याचबरोबर शेती अन्नसाखळीतील बऱ्याच गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात म्हणून ही साखळी पूर्ण होणे गरजेचे आहे.

गटशेती

गटशेती हे शेतकऱ्यांचे भविष्य असणार आहे. शेती आणि विक्री व्यवस्था पाहिली तर समूह शेती केल्याशिवाय पर्याय नाही. एका शेतकऱ्यांना एखादा नवीन व्यवसाय उभारायचा असेल तर तेवढी गुंतवणूकही करता येत नाही किंवा विक्री व्यवस्थाही उभारता येत नाही. त्यामुळे गटशेती करून सर्वांनी एक पीक घेतल्यास विक्री व्यवस्था सोपी करता येऊ शकते. शासनाकडून गटशेतील प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानही देण्यात येते.

शेतकरी उत्पादक कंपनी

एकापेक्षा अधिक शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी उभारू शकतात. या कंपनीसाठी शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात येते. त्याचबरोबर उद्योगासाठी बँकेमध्ये कर्ज मिळण्यासाठी सोपे जाते.

फूड प्रोसेस उद्योग उभारायचा असेल किंवा विक्री व्यवस्था उभारायची असल्यास शेतकरी उत्पादक कंपनी फायद्याची ठरते. राज्यात अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी उत्पादन कंपन्या सुरू केल्या आणि समृद्ध व्यवसाय सुरू केल्याचे उदाहरण आहेत.

एकात्मिक शेती

एक पीक पद्धतीपेक्षा एकापेक्षा अनेक फळझाडे किंवा पिकांची एकत्र शेती केल्यास फायद्याची ठरते. कारण जमिनीमध्ये सगळ्या प्रकारचे मुलद्रव्ये उपलब्ध असतात. पण एका झाडाला सर्व मुलद्रव्याची गरज नसते त्यामुळे वेगवेगळ्या झाडांची एकत्र लागवड केल्याने किंवा आंतरपीकपद्धतीमुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.

सेंद्रीय शेती

सेंद्रीय शेती ही कालांतराने कमी होत असली तरी सेंद्रीय अन्नधान्यांना भविष्यात मोठी मागणी असणार आहे. रासायनिक खते आणि औषधे फवारलेल्या अन्नधान्यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. ठरावीक प्रमाणात सेंद्रीय शेतीतून मिळालेले अन्नधान्यातून आपल्या कुटुंबासाठी किंवा चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी वापर करू शकतो. सेंद्रीय अन्नधान्यांमधून उत्पादकांना चांगला मोबदला मिळतो.

पडीक शेतीमध्येही वनशेती, फळशेती करू शकता

पडीक किंवा माळरानावर शेती असल्यास आणि पाण्याची कमी असल्यासही अशा जमिनीवर आपण पिकांची लागवड करू शकतो. बांबू लागवड, सागवान लागवड, महोगणी लागवड, मिलीया डुबिया लागवड, चंदन लागवड अशी वनशेती तसेच खजूर लागवड, सिताफळ लागवड, डाळिंब लागवड अशी कमी पाण्याची फळझाडे लागवड करू शकतो. त्यामुळे आपण पडीक शेतीमधूनही उत्पन्न मिळवू शकतो.

फूड प्रोसेस आणि विक्री व्यवस्था

शेतकरी उत्पन्न घेतो पण आहे तसेच विक्री करतो. उत्पादित केलेल्या अन्नधान्यांवर प्रोसस करून विक्री केल्यास आपल्याला त्याच पिकाचा दुप्पट ते तिप्पट मोबदला मिळू शकतो. फक्त शेतकऱ्यांनी अन्नप्रक्रिया आणि विक्री व्यवस्था उभारली पाहिजे. व्यापारी आणि दलाल यांच्याव्यतिरिक्त माल विक्री केला तरीही चांगला मोबदला मिळू शकतो. पण यासाठी शेतकरी उत्पादन कंपनी किंवा गटशेतीचा मार्ग अवलंबला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.