ओरोस (सिंधुदुर्ग): सहकारात पक्षीय राजकारण येवू देवू नका, तर चांगल्या लोकांच्या हातात जिल्हा बँक देवून मागच्या लोकांनी घालून दिलेला आदर्श कायम ठेवा. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. कोकणी माणूस हा विचार करुन मतदान करतो हा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती या निवडणूकीत करून चुकीच्या लोकांना बँकेपासून बाजूला ठेवा असेही आवाहन त्यांनी शरद कृषी भवन येथे आयोजित जिल्हा बँक निवडणूक पाश्वभूमीवर महाविकास आघाडी मेळाव्यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी-शिवसेना व काँग्रेस (NCP,ShivSena,Congress)महाविकास आघाडीच्यावतीने शरद कृषी भवन येथे जिल्हा बँक मतदारांची बैठक बोलाविली होती. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय (Uday Samant)सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील,(Satej Patil),विनायक राऊत (Vinayak Raut), दीपक केसरकर (Deepak Kesarker) वैभव नाईक (Vaibhav Naik), जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत(Satish Sawant), राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, (Amit Sawant)शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, प्रसाद रेगे, संदेश पारकर, प्रवीण भोसले यांच्यासह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे जिल्हा बँक उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी, अनियमीत कर्ज मिळविण्यासाठी काही जणांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते जिल्हा बँक ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. या लोकांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. तसेच शिवरामभाऊ जाधव आणि डी.बी ढोलम अशा लोकांचा आदर्श घेवून आम्ही आज पर्यत बँक चालवतो. त्यांचा आदर्श कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असेही सांगितले.
सतेज पाटील म्हणाले, बँक ही आर्थिक वाहिनी आहे. जिल्हयाचे अर्थकारण करणारी बँक म्हणून आज जिल्हा बँकेची ओळख आहे. ती ओळख आज सुरक्षित हातांमध्ये राहिली पाहिजे. जिल्हा बँक एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी शिवरामभाऊ जाधव यांनी काही तत्वे घालून दिली. आज तीच तत्वे पुन्हा एकदा सर्वांनी पाळायची आहेत. जिल्हा बँक ही आज सुरक्षित हातांमध्ये आहे. हीच आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवायची असेल तर अनुभवी लोकांना पुन्हा एकदा निवडून देणे गरजेचे आहे. चांगले कर्जदार मिळणे हे सर्वात मोठे आवाहन हे जिल्हा बँकेचे असेल असे सांगतानाच सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून संवाद साधताना सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दीपक केसरकर म्हणाले, सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्हा बँक अनेक संकटांना तोंड देत उभी केली. अनेक वृत्ती त्यावेळी आड आल्या. मात्र शिवरामभाऊ तसूभरही बाजूला झाले नाहीत. आता तीच वृती पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहत आहे. सहकारात दहशतवाद पसरविण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या प्रयत्नांना हाणून पाडायची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन संवाद सभेत केले आहे.
सतीश सावंत म्हणाले, राज्यातील काही साखर कारखाने डबघाईला आले होते. त्या साखर कारखान्यांना कर्ज देण्यात यावे यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता. मात्र ज्या मेहनतीने जिल्हा बँक उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला त्यांच्याबाबत बेईमानी करणे मला जमले नाही. यासाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केला. जिल्हा बँक सुरक्षित ठेवावी यासाठी आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. १२०० कोटी वरून २४०० कोटींवर उलाढाल करण्यात आली, असे म्हणाले.
विनायक राऊत म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आमच्या पक्षात आल्यानंतर मी किंवा सेनेच्या दोन्ही आमदारांनी एकाही पैशाचा राजकीय हस्तक्षेप आम्ही केलेला नाही. भविष्यात सुद्धा आमचा हस्तक्षेप नसणार आहे. आम्ही ही निवडणूक स्वार्थासाठी लढवीत नाही. बँक आम्हाला स्वार्थासाठी नको आहे. शेतकऱ्यांसाठी हवी आहे, असे सांगतानाच दुर्दैवाने सहकार क्षेत्रात आता राजकीय हस्तक्षेप सुरू झाला आहे. केंद्र सरकारने सहकार खाते सुरू केले आहे. हे खाते सुरू करताना महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील दिग्गज असलेल्या शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्याची मागणी आम्ही केली होती. परंतु तसे न झाल्याने आम्ही निषेध केला आहे. महाराष्ट्रातील सहकार अडचणीत आणण्यासाठी हे खाते निर्माण केले आहे, असा आरोप करतानाच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक १०० टक्के निवडून आणणार, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.