रामराजे हे शरद पवार यांना हिरो म्हणत होते आणि तिकडे गेले, असे खासदार म्हणाले, मग तुम्हीही काँग्रेसचे पंधरा दिवस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सोळाव्या दिवशी भाजपमध्ये कसे गेलात?
फलटण शहर : रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) हे चुकून झालेले खासदार आहेत. सातारा जिल्हा व माढ्याला लागलेले ते एक गालबोट आहे. आपले भविष्य घडविण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनाच दिल्लीला पाठवू, असा दृढ निश्चय सर्वांनी करावा, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, संजीवराजे (Sanjivraje Naik-Nimbalkar) यांना तिकीट मिळाले नाही, तर काहीही झाले तरी तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही, असा इशाराही त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना दिला. कोळकी (ता. फलटण) येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, मनोज पोळ, बाळासाहेब सोळसकर, रमेश पाटील, रमेश धायगुडे, सुभाष नरळे, मंगेश धुमाळ, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले, ‘‘मी बारामतीला पाणी दिले. बारामतीकर चोर आहेत, असे खासदार नेहमी म्हणतात. माझा सामना शरद पवार यांच्याशी आहे, असे म्हणणाऱ्यांच्या दूध संघाचे जेव्हा बारा वाजले होते, तेव्हा त्यांची दूध डेअरीही शरद पवार (Sharad Pawar) यांनीच वाचवली होती. त्यांना चोर म्हणायचे व अजितदादांच्या बंगल्यावर जाऊन त्यांचे पाय धरायचे व म्हणायचं माझं काही चुकलंय का? बारामतीला पाणी गेल्यामुळे फलटणसह माळशिरस तालुक्यातील एक एकर तरी ऊस कमी झालाय का? हे मला शेतकऱ्यांनी सांगावे. खरिपाच्या हंगामामध्ये नीरा उजव्यामधून जे पाणी येते, ते हिशेबात धरले जात नसल्याने ते आम्हाला मिळतच राहिले.’’
कर्नाटक, आंध्रला जे पाणी जाणार होते, त्यातले पाणी बारामतीने नेले, तर यांच्या पोटात का दुखते? असा सवाल रामराजे यांनी या वेळी केला. खासदार झाल्यावर त्यांनी पहिला जीआर काढला. नीरा-देवघरचे पाणी हे वीर धरणातून फक्त नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात द्या; परंतु आपण मोर्चा काढल्यामुळे ते थांबले. नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात हे पाणी दिल गेलं असतं, तर नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या फलटण तालुक्यातील ३६ गावांना हे पाणी मिळाले असते का? एवढे या पाणीदार खासदारांना पाण्यातले कळते, अशी टीकाही रामराजे यांनी केली.
पंतप्रधान मोदींसारख्या तपस्वी माणसाच्या नावाखाली इथं जे धंदे चाललेत, ते धंदे त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजेत आणि ते पोचवण्याचे काम आपल्याला या सभेद्वारे करायचे आहे. आम्हालाही मनमोकळेपणाने बोलायचे होते म्हणूनच आम्ही येथे कुणाचेही फोटो लावले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिहे -कठापूरच्या योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत; परंतु तुम्ही कुठलेही धरण घ्या. त्याचा पाया मीच घातला आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. मोदी व भाजपशिवाय हे जगूच शकत नाहीत.
रामराजे हे शरद पवार यांना हिरो म्हणत होते आणि तिकडे गेले, असे खासदार म्हणाले, मग तुम्हीही काँग्रेसचे पंधरा दिवस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सोळाव्या दिवशी भाजपमध्ये कसे गेलात? दहशत माजवणे हे आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व व संस्कार नाहीत. असे नेतृत्व जिल्ह्याला व जनतेला नको आहे. त्यामुळे जनतेलाही आता निर्भीडपणे मतदान करावे लागेल, असे आवाहन रामराजे यांनी केले. फलटण तालुक्यामध्ये रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर व रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी विकासाचे राजकारण केलं आहे, असे आमदार दीपक चव्हाण म्हणाले. या वेळी सुरेंद्र गुदगे यांचेही भाषण झाले.
त्यांच्या खासदाराची किंमत मतदारसंघ भोगतोय
ज्यांना मलटण माहीत नव्हते, ते दिल्ली बघताहेत
फलटण आणि माणमधील अहंकारी माणसांचा बिमोड करा
संजीवराजे यांची तलवार बाहेर काढली आहे. आता गुलाल घेऊनच ती म्यान करा.
सर्वांना मनमोकळेपणे बोलता यावं, म्हणून नेत्यांचे फोटो मेळाव्यात लावले नाहीत.
रामराजे तुम्ही सतत म्हणता, तू नक्की कुठयंस आम्ही कुणालाही भेटूद्या, कुणालाही काही म्हणू द्या; परंतु निवडणुकीत आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर आहोत. २००९ ला तुमच्या नावाने लावलेले कुंकू आम्ही पुसू तेव्हा आम्ही विधवा होऊ, त्यामुळे आम्ही पुसूच शकत नाही, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर म्हणाले. त्याचा धागा पकडून कुंकू लावले आहे; पण तुम्ही घटस्फोट घेऊ नका, अशी कोपरखळी रामराजे यांनी त्यांना मारताच मोठा हशा पिकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.