मुंबई : जर आपण अजित पवारांच्या राजकारणातल्या घडामोडी बघितल्या तर आपल्याला एक गोष्ट ठळकपणे दिसते, ती म्हणजे अजित पवार यांना जेव्हा एखादा कार्यक्रम करायचा असतो तेव्हा ते त्याची गंधवार्ता ही कोणालाही लागू देत नाहीत. पहाटेच्या शपथविधीपासून अजित पवार या धाटणीचं राजकारण करत आहेत.
राष्ट्रवादीच्या मेळाव्याला दांडी मारणं असो किंवा अचानक नॉट रिचेबल होणे... त्यानंतर आता अचानक देवगिरी वरून राजभवनात जाणं आणि थेट भाजप सरकारमध्ये सामील होणे... अजित पवार सातत्याने अशा प्रकारच्या धक्का तंत्राचा वापर करतात.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी अजून एक धक्का दिला तो म्हणजे देवगिरीवर आलेल्या सगळ्या मंत्र्यांना घेऊन ते थेट यशवंतराव चव्हाण सेंटरला गेले आणि शरद पवारांची भेट घेतली. आता अजित पवारांना खरंच शरद पवारांसोबत जायचंय की शरद पवारांची भेट घेऊन अजित पवार काही वेगळे राजकारण करू पाहत आहेत? काय आहे यामागचं राजकारण... बघूया.
अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली या मागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे शरद पवारांच्या गटातल्या आमदारांची सहानुभूती मिळवणे. आज जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावरनं मोठा वाद होण्याची शक्यता आहे. या वादामध्ये जास्तीत जास्त आमदार त्यांच्या बाजूने असतील त्याला पक्षाचे चिन्ह हे नाव मिळण्याची शक्यताही जास्त आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडावरनं ही गोष्ट आता सिद्ध झाली. त्यामुळे आताच्या घडीला अजित पवारांकडे 33 ते 35 आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या गटात दहा ते पंधरा आमदार आहेत.
या दहा-पंधरा आमदारांना स्वतःच्या गोठ्यात वळवायचं असेल तर आपण शरद पवारांच्या जवळचे आहोत हे दाखवणे गरजेचे आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये टोकाचे मतभेद नाही हा मेसेज अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली त्यातून जाऊ शकतो. आणि त्यामुळे जे आमदार कन्फ्यूज आहेत ते अजित पवारांकडे येऊ शकतात आणि म्हणूनच कदाचित शरद पवार यांना भेटून त्या आमदारांना स्वतःच्या गोटात ओढण्याचा अजित पवारांचा प्रयत्न सुरू असावा.
अजित पवारांनी शरद पवारांचं भेट घेण्याचे दुसरे कारण असू शकत ते म्हणजे डॅमेज कंट्रोल
बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी एकाच दिवशी मुंबईमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांना उघडं करणारे भाषण केलं शरद पवारांच्या दुटप्पी भूमिका, शरद पवारांचा अजित पवारांना डावलणे अशा अनेक विषयावर शरद पवारांना थेट टार्गेट केलं. पण अजित पवारांची सगळ्यात जास्त टीका गाजली ती म्हणजे, "त्यांनी शरद पवारांचे वय काढलं."
पवारांचं वय काढणं ही गोष्ट बऱ्याच लोकांना फारशी रुजली नव्हती आणि त्याचा परिणाम राजकारणातल्या सर्व स्तरातून उमटला. यातून शरद पवारांना सहानुभूती मिळाली. शरद पवारांनी लगेच घोषित केलं होतं की, ते आता महाराष्ट्रभर दौरे करणार आणि बंडखोरांच्या बालेकिल्ल्यांत सभा घेणार. त्यानुसार पहिली सभा या वेळेला पार देखील पडली पण शरद पवारांनी सूत्र पाळलं ते म्हणजे बंड झालेल्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर टोकाची टीका न करण्याचं. त्यामुळे शरद पवारांची बाजूच लख्ख उठून दिसली.
हेच डॅमेज कंट्रोल नेमक अजित पवारांना करायचे आहे आणि सहानुभूतीच्या लाटेचा फायदा शरद पवारांना मिळू नये यासाठी शरद पवार विरुद्ध बंड जरी केलं असलं तरी ते पवारांच्या आणि पर्यायाने राष्ट्रवादीच्या भल्याचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवारांचा असावा आणि म्हणूनच शरद पवारांची भेट घेऊन कुठेतरी शरद पवारांचा आम्हाला आशीर्वाद आहे, आम्हाला पाठिंबा आहे, आम्ही शरद पवारांपासून दुरावलेलो नाही आणि राष्ट्रवादीच्या भल्याचा विचार करत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवारांचा असावा.
राजकारणात 'टायमिंग'ला अत्यंत महत्त्व असते. कुठलीही गोष्ट कुठल्या टायमिंगला केली जाते यावर राजकारणातल्या घटनांचे अर्थ निघत असतात त्याचे पडसाद उमटत असतात. आता विधानसभेच्या अधिवेशनाला चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला असताना त्याच टाईमिंगला अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि यातून त्यांनी कुठेतरी अधिवेशनात होणाऱ्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचं बंड हे एकनाथ शिंदेंच्या बंडाचा नीट अभ्यास करून करण्यात आले त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बंडात ज्या चुका केल्या त्या चुका अत्यंत खूबीने टाळण्याचा प्रयत्न अजित पवारांनी त्यांच्या बंडात केला.
शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदा जेव्हा अधिवेशन झालं होतं तेव्हा त्यांच्यावर ५० खोक्यांचा आरोप करण्यात आला होता आणि हा खोक्यांचा आरोप शिंदेंच्या जिव्हारी लागला. या आरोपातून बाहेर पडणे शिंदे गटाला कुठेतरी जड जाते त्यामुळे राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर असे आरोप देऊ नये याची काळजी घेताना अजित पवार दिसत आहे आणि त्यामुळेच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन विधानसभेत जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील राष्ट्रवादीच्या दोन शिलेदारांकडून जी टीका होऊ शकते त्याची धार कमी करण्याचा प्रयत्न केलाय.
अजित पवार यांच्या शरद पवारांसोबत होणाऱ्या वारंवार भेटी या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या आमदारांना बुचकाळ्यात टाकू शकतात किंवा यातून विरोधाची धार कमी करू शकतो. त्यामुळेच अजित पवारांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शरद पवारांची भेट घेतली आणि एका दगडात तीन पक्षी मारले. त्यानंतर ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीसुद्धा यशवंतराव चव्हाण सेंटरवर शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.