Baramati News: राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची अडचण असून, शेतीला पाणी नाही. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि महागाई वाढत असून भ्रष्टाचाराचा हिशोब लागत नाही. इन्कमटॅक्स, सीबीआय आणि इडीच्या दडपशाहीला मतदारांनी नाकारले असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यातील त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात आल्या होत्या. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पुण्यातील आणि मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत केले. गुलाल उधळत आणि ढोल ताशाच्या गजरात विजयाचा जल्लोषही साजरा केला.
निसर्ग मंगल कार्यालय येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. मागील एक वर्ष हे संघर्षाचे वर्ष होते. महाराष्ट्रात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने राज्याच्या समोर होती. दुधाचा भाव शहरात वाढलेला असून ग्रामीण भागात मात्र कमी झालेला आहे. राज्यभर दुष्काळाची परिस्थिती असून अनेक ठिकाणी छावण्याची मागणी असून ती मान्य होत नाही. राज्यात छावण्या नाहीत, चारा डेपो नसून पाण्याचे टँकर देखील वेळेवर पोहचत नाहीत. या सर्व प्रकाराला राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे.
इंडिया आघाडीचा दिल्लीत झालेल्या बैठकीवर सुळे म्हणाल्या, सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीकडे मॅजिक फिगर नाही. परंतु इंडिया आघाडीच्या नेत्यांची सत्ता स्थापनेची इच्छा आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पहिल्यांदा संधी दिली जाईल. इंडिया आघाडीला कोणताही निर्णय घाई घाई मध्ये घ्यायचा नाही. इंडिया आघाडीची सत्ता स्थापनेची तयारीत असून सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत.
-
महाविकास आघाडीच्या यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही काय सल्ला द्याल आणि बारामतीतील पवार यांच्या विकासाच्या मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, “वयाने आणि कर्तृत्वाने मोठे असणाऱ्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो सल्ला घ्यायचा असतो. तसेच विकासाबाबत कोणीही काही नाकारत नाही. मात्र माझी लढाई ही कोणत्याही व्यक्ती विरोधात नसून ती कायमच वैचारिक असते.”
अजित दादा सोबत असणाऱ्या आमदारांनी आपणास शुभेच्छा दिल्या का? या पत्रकारांच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, आपल्या संस्कृतीत शुभेच्छांना कधीही नाही म्हणायचे नसते सर्वांच्या शुभेच्छा नम्रपणे स्वीकाराच्या असतात. असे म्हणत किती आमदारांनी शुभेच्छा दिल्या यावर मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले.
-
विजयानंतर शुभेच्छांसाठी सुनेत्रा वहिनींचा फोन आला का या पत्रकारांच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, “त्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत. त्या वयाने, नात्याने आणि पदाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नेहमी प्रेम आणि आदरच राहील. तसेच पार्थ आणि जय हे माझ्या मुलासारखे आहेत.
धंगेकरांच्या पराभवावर बोलताना सुळे म्हणाल्या, ते उमदे लोकप्रतिनिधी आहेत. उशिरा तिकीट जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचाराला अवधी कमी मिळाला. त्यांनी चांगली फाईट दिली आहे. चांगले प्रतिनिधी म्हणून ते दिल्लीला आले असते परंतु राजकारणात जय पराजय होत असतो. परंतु निवडणुकीनंतर हिट अँड रन प्रकरणात धंगेकर सर्वसामान्य नागरिकांसोबत उभा राहिले. या प्रकरणात धंगेकर उभा राहिले नसते तर कदाचित त्या दोन युवक-युवतींना न्याय मिळाला नसता.
मी आणि आमदार रोहित पवार उद्यापासून (ता. ७) बारामती मतदारसंघातील दुष्काळी पाहणी दौरा करणार आहोत. या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.