आज अजितदादा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणेस्थित कार्यालयात गेले होते, बहुधा प्रथमच. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तर नक्कीच पहिल्यांदाच. निमित्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळलेल्या ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनाचे.
संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भाजपच्या बर्याच बडया नेत्यांचे मदनजी मेन्टर. मात्यापित्याच्या प्रेम आणि शिस्तीचा संगम असलेले मदनजी हे जेपी नड्डांपासून तर विनोद तावडे यांच्यापर्यंतच्या भाजपच्या बिनीच्या नेत्यांचे पालक. प्रदीर्घ आजाराने जर्जर झालेल्या त्यांच्या कुडीने प्राण सोडले.
या अंतिम प्रवासात मदनजींना शेवटचा नमस्कार करायला भाजपचे क्रमांक दोनचे नेते अमित शहा संसदेचे अधिवेशन सुरु असतानाही पुण्याकडे अंत्यदर्शनासाठी निघाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नव्यानेच भाजपशिवसेना युतीत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पुण्याकडे निघाले. अमितभाई येणार म्हणजे महाराष्ट्रातल्या तिन्ही नेत्यांनी तेथे हजर रहाणे आलेच.
देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून तयार झालेले. ते आदल्या दिवशी रात्रीच पुण्याला पोहोचले होते.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील तर काल दुपारीच पुण्याला रवाना झाले होते. या दोघांनीही तेथे जाणे हे रास्त होतेच.
एकनाथ शिंदेही हिंदुत्वाच्या विचाराचे. त्यामुळे ते सकाळी रवाना होणार हे ठरले होतेच. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपच्या वळचणीला दाखल झाली आहे. भाजपची संस्कृती या मंडळींना फारशी माहिती नसावी. माहित आहे ते केवळ अमित शहा यांचे महत्व. उपमुख्यमंत्री कार्यालयाने आज अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांची बैठक बोलावली होती. सकाळी नऊ वाजता ही बैठक ठरवली गेली होती.
अन्य दोन नेते नसताना ही बैठक बोलावली गेली कशी हा प्रश्नही चर्चेत होताच. मुख्यमंत्री बदलणार नाहीत हे कालच सांगितले गेले होते अन अजितदादांनीही समर्थकांना उत्साह आवरा असे आदेश दिले होते. तरीही आजच्या बैठकीचा उत्साह का असा प्रश्न विचारला जात असतानाच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पुण्याकडे निघाले.
अमितभाईंसमोर उपस्थिती नोंदवणे आवश्यक होते.ते कदाचित कार्यालयाच्या नंतर लक्षात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात "एंड ऑफ आयडियालॉजी " चे पर्व सुरु झाले आहे. त्यामुळे असेल पण अजितदादा आयुष्यात प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयात पोहोचले.
मोदी बागेत वावरणारे मोतीबागेत गेले. मोदीबाग हे पवार कुटुंबाचे घर तर मोतीबाग हे संघाचे कार्यालय. पुण्यात दोन्ही बागा बहुचर्चित. अजितदादा लवकरच मुख्यमंत्री बनणार ही चर्चा काल रात्री उशीराने थांबली होती. हे कसे शक्य आहे? १०५ जणांचा भाजप वैचारिक जवळीक नसलेल्या, पाठीराखे आमदार किती हे ही माहित नसलेल्या नेत्याला भाजप नावाची सध्याची महाशक्ती खरेच मुख्यमंत्री करेल?
चर्चा जोरात सुरु असताना प्रशासकीय कसबासाठी वाखाणले जाणारे अजितदादा बैठक रद्द करुन पुण्याला गेले.कामाचा प्रचंड उरक असलेले, महाराष्ट्राची इत्थंभूत माहिती असलेले अजितदादा ४० आमदारांना घेवून शरद पवारसाहेबांच्या छत्रछायेतून बाहेर पडून भाजप आघाडीत सामील झाले आहेत.
या सीमोल्लंघनानंतर ते सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्ताजी होसबाळे यांना प्रथमच भेटले. मोतीबागेत मदनदास देवींचे अंत्यदर्शन घेवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेसमवेत महाराष्ट्राच्या तिन्ही नेत्यांनी काही समर्थक आमदार कार्यकर्त्यांसह किंचित काळ एका हॉटेलात थांबून गप्पाही केल्या. केले.
संघाने उभी केलेली कामे आणि त्यासाठी हजारो प्रचारकांनी केलेला त्याग याचे स्मरण कृतज्ञतेने ओथंबलेल्या अंत:करणांनी नेते करत असतानाच अजितदादांनी त्यांच्या कुटुंबाशी हिंदुत्ववादाचा कसा घनिष्ट संबंध आहे. आईच्या माहेरी उजवे वातावरण कसे आहे हे नमूद केल्याचे उपस्थित सांगत होते. मोदीबाग ते मोतीबाग या प्रवासाची मुख्यमंत्री शिंदे यांनीच नव्हे तर संघपरिवाराच्या संस्कारी घरात जन्म झालेल्या देवेंद्र फडणवीसांनीही नोंद घेतली असणारच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.