Ajit Pawar NCP : भावकीत गोडी नाहीच! चुलता-पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं; वाचा इतिहास

इतिहास साक्षीदार आहे! चुलतापुतण्याचं राजकारण महाराष्ट्रात कधीच यशस्वी झालं नाही
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPSakal
Updated on

महाराष्ट्रातील जनतेने स्वप्नातही विचार केला नसेल अशी राजकीय घडामोड आज घडली अन् सगळ्यांनाच हादरा बसला. राजकारणातील महामेरू किंवा राजकारणाती सगळ्यांत जुनं खोड म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एवढी मोठी फूट पडेल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती. जो व्यक्ती सगळ्या राजकारण्यांवर गुगली टाकतो तोच राजकारणी असा त्रिफळाचित कसा काय झाला असा विचार सगळ्यांनाच पडलाय.

पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास उकरून काढला तर चुलता-पुतण्याचं, भावकीचं राजकारण महाराष्ट्रात कधीच यशस्वी झालं नाही हे आपल्याला दिसेल. पेशव्यांच्या काळातल्या 'काका मला वाचवा' या ऐतिहासिक वाक्यापासून सुरु झालेला प्रवास आज अनेक राजकीय घराण्यांमध्ये दिसून येतो.

अजित पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी ते राज्याचे विरोधीपक्षनेते होते पण दुपारून ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत ९ आमदारांनीसुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या एकूण ५४ आमदारांपैकी जवळपास ३५ ते ४० आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे.

त्यांनी आता पक्षावरही दावा केलाय, पक्ष आमचाच, आमदार-खासदारही आमच्यासोबत आहेत आणि ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं अजित पवार म्हणालेत पण शरद पवार आणि त्यांच्या बोलण्यात कोणतीच सुसंगती दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा चुलतापुतण्याच्या आणि भावकीच्या राजकारणातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCP : पक्ष आमचाच, आमदार-खासदारही आमच्यासोबत, कुणीही फुटलेलं नाही; अजित पवारांची प्रतिक्रिया

चुलता पुतण्याच्या न टिकलेल्या राजकारणाचा इतिहास असलेले बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, अनिल देशमुख-आशिष देशमुख, जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर, सुनील तटकरे-अवधूत तटकरे आणि त्यानंतर आता शरद पवार-अजित पवार यांचं नावही त्याच यादीत सामील झालं आहे. याचबरोबर बदामराव पंडित-अमर पंडित यांच्यासारखे अनेक न टिकलेले राजकीय घराणे महाराष्ट्रात पाहायला मिळतील.

बाळासाहेब ठाकरे - राज ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाला अनुमोदन दिलं होतं. पण चुलत्यासोबत लहानपणापासून राजकारण शिकलेल्या राज ठाकरेंना राजकारणाचा अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा सोपवल्याची गोष्ट सहन झाली नाही. त्यांची नाराजी प्रत्येक हालचालीतून दिसत होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली होती.

Ajit Pawar NCP
Maharashtra Politics News : आता शिंदेंचं काय होणार? ज्यांच्यासोबत 36चा आकडा तेच आले साथीला

गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे हे मराठवाड्यात लोकनेते म्हणून प्रसिद्ध. मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा म्हणून त्यांची ओळख. त्यांच्याच करंगळीला धरून पुतणे धनंजय मुंडे राजकारणात आले, राजकारणाच्या आखाड्यातील डाव ज्या चुलत्याकडून शिकले त्याच चुलत्याशी नंतर मतभेद झाले आणि ते भाजपमधून बाजूला गेले. नंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविरोधात दंड थोपटले आणि निवडूनही आले. आता ते राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते आहेत.

जयदत्त क्षीरसागर-संदीप क्षीरसागर

मराठवाड्यातील चुलता पुतण्याच्या न टिकलेल्या राजकारणातील हे दुसरे मोठे घराणे. क्षीरसागर या नावाशिवाय बीड जिल्ह्याच्या राजकारणाला पूर्णत्व येऊच शकत नाही. केशरकाकू हे या घराण्यातील जुनं प्रस्थ. त्या तीनवेळा बीडच्या खासदार राहिल्या. क्षीरसागर यांचं पूर्ण कुटुंबच राजकारणात होतं. पण या कुटुंबात नंतर वाद झाले अन् २०१९ ला बीडला चुलता-पुतण्यात लढत झाली. पुतण्या संदीप राष्ट्रवादीकडून तर चुलते जयदत्त शिवसेनेकडून लढले पण वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री राहिलेल्या चुलत्यांना यावेळी पराभव स्विकारावा लागला.

Ajit Pawar NCP
मोठी बातमी! अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवारांचा पाठिंबा नाही | Ajit Pawar

अनिल देशमुख-आशिष देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांचे वैर आपल्याला परिचित असेल. काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ साली पुतण्या असलेल्या आशिष देशमुख यांनी चुलते अनिल देशमुख यांचा कटोल विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवली पण यावेळी त्यांना अपयश आले आणि पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय.

सुनिल तटकरे-अवधूत तटकरे

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर पुतणे अवधूत तटकरे यांचे चुलत्यांशी मतभेद झाले. यानंतर अवधूत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पण त्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह पाहून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते पुन्हा चुलत्याच्या कुटुंबाविरूद्ध दंड थोपटणार आहेत.

यानंतर आता महाराष्ट्रातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमधून पुतणे असलेले अजित पवार हे जवळपास तीन चतुर्थांश आमदारांना घेऊनच बाहेर पडले आहेत. ते फक्त बाहेरच पडले नाही तर त्यांनी पक्षाशी बंडही केलं आहे. तर शरद पवारांनी आम्ही लोकांमध्ये जाणार असल्याचं सांगत त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला भावकीच्या आणि चुलता पुतण्याच्या राजकारणाचं वावडं असल्याचं पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध झालंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.